खानापूर : पुढारी वृत्तसेवा ; गेल्या दोन दिवसांपासून खानापूर तालुक्यातील गोलिहळ्ळी वन विभागाच्या व्याप्तीत येणाऱ्या करीकट्टी, गोधळी, भुरुणकी भागात १७ हत्तींच्या कळपाकडून ऊस पिकाचे अतोनात नुकसान सुरू आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने हत्ती डेरेदाखल झाल्याने त्यांना रोखण्याचे शेतकरी आणि वनविभागाचे प्रयत्न तोकडे ठरत आहेत.
परिणामी नुकसानीचे सत्र सुरूच असून तोडणीला आलेला ऊस कळपाकडून भुईसपाट होत असल्याने वर्षभराच्या मेहनतीवर पाणी सोडावे लागत आहे. दांडेली जंगलातून खाद्याच्या शोधात दरवर्षी हत्ती या भागात दाखल होतात. तट्टीनाल्यातील मुबलक पाणीसाठा आणि दोन्ही बाजूला असलेले हिरवेगार शिवार मिळाल्याने हत्तींनी याच परिसरात तळ ठोकला आहे. या कळपात दीड ते दोन महिने वयाची ४ लहान हत्तीची पिल्ले आहेत. या पिल्लांच्या सोबतीमुळे हत्ती अधिक आक्रमक होत आहेत. शेतात येण्यापासून हत्तींना रोखण्यास गेलेल्या शेतकऱ्यांवर धावून येण्याचा प्रकार घडत असल्याने हाताशपणे झालेले नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहण्यावाचून शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही.
मळणीसाठी तयार असलेल्या भातगंज उद्ध्वस्त करून मोठी नासाडी करण्यात आली आहे. दोन दिवसांत २० एकरांतील डझनभर शेतकऱ्यांच्या भात, मका, ऊस, केळीच्या बागा आदी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. हणमंत अंबरापूर, गुड्साब साहुकार, तिम्माना अंबरापूर, राम अंबरापूर, मनोहर पाटील, मुरलीधर पाटील, बुद्दा हेरेकर, भुजंग पाटील, अर्जुन वड्डर, मारुती पाटील, कल्लाप्पा पाटील आदी शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे. हत्तींनी केळीच्या बागांसह शेताच्या बांधावर असलेली नारळाची झाडेही जमीनदोस्त केली आहेत.