संबरगी : पुढारी वृत्तसेवा : काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकत असताना अचानक अंपगत्व आले. दोन्ही पाय निकामी झाल्याने त्याच्या हातात आता काठी आली आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा आहे. अथणी तालुक्यातील जंबगी येथील खंडू राजाराम जाधव (वय ४५) यांच्यावर ही परिस्थिती ओढवली असून कोणी मदत देता का मदत, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
हाताला काम नसल्याने दोनवेळचे अन्न मिळणेही मुश्कील झाले आहे. सरकारकडून मिळणाऱ्या चौदाशे रुपये वेतनावर ते कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. खंडू जाधव यांनी जंबगी येथे प्राथमिक, संबरगी येथे माध्यमिक तर उच्च माध्यमिक शिक्षण मदभावी येथे घेतले. त्यानंतर नोकरीसाठी ते चोहीकडे फिरले पण यश आले नाही. त्यामुळे मिळले ते काम करून संसाराचा गाडा हाकू लागले. काबाडकष्ट करून जीवन जगत असताना अचानक त्यांना अपंगत्व आले आणि पाय निकामी झाले.
जमीन गहाण ठेवून त्यांनी उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे पोट कसे भरायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. अखेर पोटाची खळी भरण्यासाठी पत्नी कामाला जाऊ लागली. परंतु तुटपुंज्या उत्पन्नावर उदरनिवार्ह करणे कठीण झाले आहे.
तिचाकी देण्याची मागणी ते ग्रामपंचायतीकडे अनेक वर्षे करत आहेत. परंतु कोणीही दखल घेत नसल्याचे ते सांगतात. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
पत्र्याच्या शेडमध्ये ते राहत असून तुटपुंज्या उत्पन्नावर संसार चालवत आहे. त्यांची मुलगी अंगणवाडीला जात आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठीच पैशांची चणचण भासत आहेत. त्यामुळे मुलीच्या शिक्षणाचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे समाजातील दानशुरांसह सरकारने त्यांना मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी होत आहे.