विजापूर : प्रेमभंग झालेल्या युवकाने आधी व्हिडीओ बनवत आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले अन् काही वेळाने प्रवाशांनी भरलेल्या बसला समोरून दुचाकीवरून भरधाव धडक देत जीवन संपवले. त्यात युवकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला, शिवाय बसही भस्मसात झाली. बसमधील प्रवाशांनी वेळीच बाहेर धाव घेतल्याने ते बचावले अन् मोठा अनर्थ टळला. विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यात कन्नोळी टोल नाक्याजवळ मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला.
सुरुवातीला हा नैसर्गिक अपघात असल्याचे मानले जात होते; पण मृत तरुणाने अपघाताआधी इन्स्टाग्रामवर पाठवलेल्या व्हिडीओमुळे हा अपघात नसून नियोजित आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले. अभिषेक नागराळ (वय 22, रा. सावळगी, जि. विजापूर) असे मृत युवकाचे नाव आहे.
अभिषेकने अपघातापूर्वी इन्स्टाग्रामवर एक सेल्फी व्हिडीओ पोस्ट करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते. ‘वैयक्तिक कारणांमुळे मी मरणार आहे. माझ्या मृत्यूला तीन लोक जबाबदार आहेत. त्या तिघांमुळे मी आत्महत्या करत आहे’, असे सांगत त्याने त्या तिघांची नावेही घेतली आहेत. त्यात एका महिलेचा समावेश आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तींचे फोटोही त्याने सोशल मीडियावर पाठवले आहेत.
हा व्हिडीओ पाठवल्यानंतर काही वेळातच कन्नोळी टोल नाक्याजवळ विजापूरकडे जाणाऱ्या बसला अभिषेकने दुचाकीवरून समोरून धडक दिली. धडकेनंतर दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. त्या आगीत अभिषेक जागीच ठार झाला, तर बसही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनास्थळी सिंदगी अग्निशमन दलाने धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेची नोंद सिंदगी पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.