बेळगाव, कंग्राळी खुर्द : सोबत येताना त्याने व्हिस्कीचा टेट्रापॅक आणलेला... शेंगदाण्याचे पाकीट पाण्याची बाटलीही होती... नदीकाठी बसून आधी तो प्यायला... त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूरला घरी व्हिडीओ कॉल केला आणि घरच्या लोकांना सांगितले की, जीवनाला कंटाळलो आहे, मरून जातो... आणि मग त्याने व्हिडीओ कॉल सुरूच ठेवत मार्कंडेय नदीत उडी मारली...
शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास कंग्राळी खुर्दपासून काही अंतरावर असलेल्या मार्कंडेय नदीच्या लहान पुलाजवळ ही घटना घडली. सचिन माने (वय 45, रा. कंग्राळी खुर्द, मूळ सोलापूर, महाराष्ट्र) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन माने हा मूळचा महाराष्ट्रातील सोलापूर येथील असून गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावला राहतो. तो सुतारकीचे काम करून संसाराचा गाडा हाकतो. त्याची पत्नी, मुलगा व मुलगी सर्वजण कंग्राळी खुर्द येथे राहतात.
शनिवारी सकाळी सचिनने सोलापूरला राहणार्या आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल केला. आधी तो कॉल करून मोठमोठ्याने ओरडत होता. त्यांना काही तरी सांगत होता. त्यानंतर त्याने मी जीव देतो, असे म्हणत हातात मोबाईल घेऊनच उडी मारली. सचिन कांदे विक्री, पेट्रोल पंपावर काम, भांडी विक्री अशी मिळेल ती कामे करत होता. गेले 10-12 दिवस तो यात्रेसाठी बहिणीकडे सोलापूरला जाऊन कालच कंग्राळीला परत आला होता. त्याचा पश्चात पत्नी, एक मुलगा, विवाहित मुलगी असून मुलगीही बाळंतपणासाठी माहेरी आहे.
सचिनला उडी मारताना पाहिलेल्या युवकांनी त्याच्या 23 वर्षाच्या मुलाला फोन केला. तुझ्या वडिलांसारखे कोणीतरी होते बघ, ते वाहून गेले आहेत, असे सांगताच मुलगा त्याची आई व अन्य नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले.
सचिनला उडी मारताना पाहिलेल्या युवकांनी एपीएमसी पोलीस स्टेशन, अग्नीशमन, एसडीआरएफ आणि एचईआरएफ या यंत्रणांना माहिती दिली. हा भाग एपीएमसी व काकती या दोन्ही ठाण्यांच्या हद्दीत येत असल्याने दोन्ही ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी गेले. त्यांनी नदीत बोटी व कॅमेर्याचा सहाय्याने शोधकार्य सुरू केले. पण नदीत वाढलेली झुडपे, प्लास्टिक, शेतीत वापरून टाकलेले मल्चिंग पेपर यामुळे शोध कार्यात अडचण येत होती. एचईआरएफचे बसवराज हिरेमठ, राजू टक्केकर, संतोष दरेकर, एसडीआरएफचे शिवाणंद हणमण्णावर, रविंद्र अप्पय्यण्णावर, गंगापा उडकेरी, सिराज मोकाशी, बसवराज मणगेरी व सहकारी तसेच अग्नीशमन विभागाचे किरण पाटील, नजीर पैलवान,केदारी मालगार यांनी शर्थीचे प्रयत्न केले.
नदीकाठावर बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. एपीएमसी पोलिसांनी गर्दी हटवून शोधकार्याला सहकार्य केले. मात्र सचिनचा शोध लागला नाही. अंधार झाल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले. रविवारी सकाळी पुन्हा शोधतोपर्यंत पोलिसांनाही कळवण्यात आले होते. पोलिसही आले. बोटीच्या सहाय्याने शोध सुरू झाला. मात्र नदी दुथडी भरून वाहत असल्याने सचिनचा शोध शनिवारी सायंकाळी अंधार पडेपर्यंत लागला नाही. रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवली जाणार आहे.
सचिन माने जेव्हा नदीत उडी मारण्याच्या पावित्र्यात होता, तेव्हा बाजूलाच दोघे तरुण थांबलेले होते. त्यांना सुरुवतीला काही कळाले नाही. पण सचिनने उडी मारल्याचे लक्षात येताच हे दोन्ही तरुण पुढे सरसावले. त्यांनी तातडीने एक काठी आणली व ती काठी पकडण्याची सूचना सचिनला केली. परंतु, सचिनने काठी पकडली नाही. त्यामुळे तो तसाच वाहून गेला.