बेळगाव

Belgaum Youth Death: कायम नोकरीची आस, तरुणाचा गळफास

हिंडाल्को आवारातील घटना; मृत्यूपूर्वी स्टेटस, पाच लाख घेतल्याचा मनस्ताप

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : हिंडाल्को कंपनीतील नोकरीत कायम करतो, असे सांगून कंत्राटदाराने पाच लाख रुपये घेतले. पण नंतर शिक्षण कमी आहे, कायम करता येत नाही, असे सांगितले. शिवाय नवीन कामगार भरती करताना जुन्या कामगारांना काढणार, या भीतीतून एका तरुणाने हिंडाल्को फॅक्टरी परिसरात गळफास घेतला.

शंकर सिद्राय तळवार (वय २६, रा. मुत्यानहट्टी, ता. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत माळमारुती पोलिसांत नोंद प्रक्रिया सुरू होती.

मृत्यूपूर्वी सदर तरुणाने, 'आपण जग सोडतो आहोत, आई-बाबा मला माफ करा, माझ्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करा', असा व्हिडीओ बनवून तो स्टेटसला ठेवला. त्यामुळे मुत्यानट्टीतील शेकडो ग्रामस्थांनी फॅक्टरी परिसरात निदर्शने केली. दगडफेकीची घटना घडल्याने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. शंकर पाच-सहा वर्षांपासून इंडाल फॅक्टरीत कार्यरत होता. तुला नोकरीत कायम करतो, असे सांगत कंत्राटदाराने त्याच्याकडून

५ लाख रुपये घेतल्याची माहिती समोर येत आहे. पैसे दिल्यानंतरही तो कायम करत नव्हता. कंपनीतील जुन्या कामगारांना काढून नवीन भरती करणार असल्याची चर्चा सुरू झाली. आपली नोकरी जाणार, याला पूर्णपणे कंत्राटदार जबाबदार असल्याचे वक्तव्य स्टेटसमध्ये शंकरने ठेवले. त्यानंतर त्याने या परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

ग्रामस्थ आक्रमक

आपल्या गावच्या तरुणाने आत्महत्या केल्याचे समजताच मुत्यानहट्टीचे शेकडो ग्रामस्थ हिंडाल्को परिसरात जमले. कंत्राटदार आणि कंपनीचा सावळा गोंधळच रवीच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी कंपनीच्या कार्यालयावर दगडफेक केली. यामध्ये खिडकीची तावदाने फुटली.

पोलिस आयुक्त घटनास्थळी

माहिती मिळताच माळमारुती व काकतीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्त भूषण बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी नारायण बरमणी व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. ५० हून अधिक पोलिस, केएसआरपीच्या तुकड्यांसह येथे बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT