Murder 
बेळगाव

Belgaum Murder Case : माणकापूरमध्ये भरदिवसा युवकाचा खून

डोळ्यांत चटणी टाकून धारदार शस्त्राने वार : वाहनावरून पाठलाग

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : माणकापूर (ता. निपाणी) येथील नवीन पेट्रोल पंपाच्या मागील शेतात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. मंदार अजित रानडे (वय ३५, रा. इचलकरंजी) असे मृत युवकाचे नाव आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मंदार रानडे यांचा माणकापूर रोडवरील शेतवडी परिसरात वाहनावरून पाठलाग करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या डोळ्यांत चटणी टाकून धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रानडे यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्लेखोर कोण होते, त्यांनी मंदार रानडे यांचा पाठलाग का केला आणि खुनामागील नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सदर घटना पूर्ववैमनस्यातून घडली आहे की अन्य कोणत्या कारणातून, याचा पोलिस तपास करत आहेत. हल्ल्यात किती जणांचा सहभाग होता, या घटनेमागे आणखी कोणाचा हात आहे का, याचाही शोध सुरु आहे. माणकापूरसारख्या परिसरात भरदिवसा शेतात घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांच्या तपासानंतरच हत्येचा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यामागील कारण स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बसनगौडा नेर्ली, सीपीआय विश्वनाथ चौगुला, एएसआय वाडकर, पोलिस कर्मचारी संजू जमकोळी, शिवानंद पुजारी, गजू हळवर, संतोष गडदे आणि काडप्पा मदूर यांनी भेट देऊन पाहणी केली. मंदार रानडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT