Chikodi Young cricketer Cheated in Fake IPL Selection
चिकोडी: आयपीएलमध्ये राजस्थान संघात निवड करून देण्याचे आमिष दाखवून एका युवा क्रिकेटरची २४ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राकेश येडूरे (वय १९, रा. चिंचणी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) असे फसवणूक झालेल्या युवा क्रिकेटरचे नाव आहे. याप्रकरणी बेळगाव जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य पातळीवरील क्रिकेट स्पर्धेत खेळत असलेल्या राकेशला देखील आयपीएलमध्ये संधी मिळावी, अशी इच्छा होती. दरम्यान, आयपीएलमध्ये क्रिकेट खेळण्याची संधी दिली जाईल, असा इंस्टाग्रामवर एक मेसेज त्याला आला. या मेसेजमध्ये राजस्थान संघामध्ये निवड होण्यासाठी अॅप्लीकेशन फॉर्म भरून दोन हजार रुपये पाठवावे, असा मजकूर पाठविण्यात आला होता.
या मेसेजवर विश्वास ठेवून राकेशने टप्प्याटप्प्याने एकूण 24 लाख रुपये इतकी रक्कम पाठविली. प्रत्येक मॅचला चाळीस हजार रुपये व आठ लाख रुपये मिळवून देऊ, असे आमिष त्याला दाखवले जात होते. त्यामुळे मागील 23 डिसेंबर 2024 पासून 19 एप्रिल 2025 पर्यंत 24 लाख रुपये इतकी रक्कम त्याच्याकडून ऑनलाइन ट्रान्सफर करून घेण्यात आली. इतकी मोठी रक्कम घेऊन देखील राजस्थान संघात किंवा आयपीएलच्या इतर संघात त्याची निवड न झाल्याने त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या याप्रकरणी त्याने बेळगाव जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मे 2024 मध्ये हैदराबाद मध्ये झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत राकेश चांगला खेळला होता. त्यावेळी झालेल्या स्पर्धेदरम्यान क्रिकेट निवड समिती सदस्य आले होते. त्यानंतर या स्पर्धेत सहभागी होऊन घरी परतल्यानंतर चार महिन्यांनी राकेशच्या instagram वर आलेल्या एक मेसेजमुळे त्याची मोठी फसवणूक झाली.
राकेशचे वडील कर्नाटक परिवहन महामंडळात सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. बेताची परिस्थिती असताना मुलासाठी त्यांनी इतरांकडून पैसे गोळा करून लाखो रुपये भरले आहेत. त्यामुळे कोणत्याही ऑनलाइन मेसेजवर कुणीही विश्वास ठेवू नये. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन बेळगाव जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.- डॉ. भीमाशंकर गुळेद, बेळगाव, पोलीस अधीक्षक