बंगळूर, धारवाड : भाजपचे युवा नेते योगीश गौडा यांच्या हत्येप्रकरणी धारवाड ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह 16 जणांना बंगळूरच्या विशेष लोकप्रतिनिधी न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर आणखी एक आरोपी पोलिस अधिकारी चन्नकेशव टिंगरीकर याला न्यायालयाने 7 वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला आहे.
दोन आरोपी माफीचे साक्षीदार बनले होते. पैकी एकाला माफी देण्यात आली असून, दुसऱ्याने साक्ष फिरवल्याने त्याच्यावर नव्याने खटला चालणार आहे. याशिवाय दोन आरोपींचा सहभाग सिद्ध न झाल्याने त्यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. एकूण 21 जण आरोपी होते.
2013 ते 2018 या काळात राज्यात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी कुलकर्णी धारवाड जिल्ह्याचा पालकमंत्री होता. त्याने 15 जून 2016 रोजी हा खून घडवून आणला होता. धारवाड जिल्हा पंचायत सदस्य असलेले योगीश गौडा सायंकाळच्या सुमारास जिममधून बाहेर पडत असताना आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर विळ्या-कोयत्यांनी वार करत निर्घृण खून केला होता. कुलकर्णी यांनी सुपारी देऊन योगीश यांचा खून घडवून आणल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर हा निकाल देण्यात आला. निकालानंतर कुलकर्णी यांना अटक झाली आहे. शिवाय, त्यांची आमदारकीही रद्द झाली आहे. याव्यतिरिक्त, योगीश गौडा यांच्या मुलांना 16 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
खून प्रकरणात एकूण 21 आरोपी होते. पैकी क्रमांक एकचा आरोपी बसवराज मुत्तगी माफीचा साक्षीदार बनला. त्याने कटाचा खुलासा केला. त्यामुळे त्याला माफी देण्यात आली. तर क्रमांक 17 चा आरोपी शिवानंद हाही माफीचा साक्षीदार बनला होता. मात्र, ऐनवेळी त्याने साक्ष फिरवली. त्यामुळे त्याला पुन्हा आरोपी बनवून त्याच्यावर खटला चालवण्याची मागणी करणारा अर्ज सीबीआयने त्याच न्यायालयात दाखल केला आहे.
न्यायालयाने या प्रकरणात आरोपी क्र. 20 वासुदेव निलेकानी आणि आरोपी क्र. 21 सोमशेखर यांच्या सुटकेचे आदेश दिले. विक्रम, कीर्ती कुमार, संदीप, विनायक, महाबळेश्वर ऊर्फ मुदका, संतोष, दिनेश, अश्वथ, सुनील, नजीर अहमद, शाहनवाज, नूतन, हर्षित, नाझीर, विन्यास कलबुर्गी अशी दोषी ठरलल्या इतर 15 आरोपींची नावे आहेत.