बेळगाव : येळ्ळूरमधील (ता. बेळगाव) सरकारी मराठी मॉडेल शाळेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला शनिवारी (दि. 26) प्रारंभ होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे प्रमुख पाहुणे असतील. यानिमित्त रविवारीही (दि. 27) विविध कार्यक्रम होणार आहेत.
शनिवारी सकाळी आठ वाजता प्रबोधन फेरीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर उद्घाटन कार्यक्रम होणार असून माजी ता. पं. सदस्य रावजी पाटील अध्यक्षस्थानी असतील. जिल्हा पालकमंत्री मंत्री सतीश जारकिहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार जगदीश शेट्टर, इराण्णा कडाडी, आमदार अभय पाटील, राजू सेट, विठ्ठल हलगेकर, गणेश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी, लखन जारकीहोळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार मनोहर किणेकर, महांतेश कवटगीमट, परशुराम नंदिहळ्ळी, प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात येणार आहे. दुसर्या सत्रात सत्कार कार्यक्रम होणार आहे. तिसर्या सत्रात डॉ. रणधीर शिंदे (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्राथमिक शिक्षणापुढील आव्हाने’ यावर प्रा. आनंद मेणसे यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
रविवारी (दि. 27) सकाळी 10 वाजता व्याख्यान आणि सत्कार कार्यक्रम होणार आहे. ‘मराठी अभिजात भाषेची समृद्ध परंपरा’ या विषयावर डॉ. डी. एम. पाटील (गडहिंग्लज) यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी राम नांदूरकर (कोल्हापूर) असतील. दुसर्या सत्रात स्मृतींना उजाळा हा कार्यक्रम होणार आहे. तिसर्या सत्रात सत्कार कार्यक्रम होणार असून चौथ्या सत्रात संत परंपरा आणि समाज प्रबोधन या विषयावर हभत ज्ञानेश्वर बंडगर यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रा. वाय. एन. मेणसे राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.