बेळगाव : येळ्ळूरच्या वेशीतील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक बळजबळरीने हटवल्यामुळे आंदोलन करणाऱ्या येळ्ळूरच्या मराठी कार्यकर्त्यांना घरात घुसून अमानुष मारहाण केल्यानंतर त्यांच्यावरच खटले दाखल केलेल्या कर्नाटकी पोलिसांना बुधवारी न्यायालयाकडून दणका मिळाला. न्यायालयाने दोन खटल्यांमध्ये 56 मराठी कार्यकर्त्यांची दंगलीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामध्ये पाच महिलाही आहेत.
महत्त्वाचे म्हणजे या निकालाबरोबर पोलिसांनी दाखल केलेल्या एकूण सातही गुन्ह्यांतून मराठी कार्यकर्ते निर्दोष मुक्त झाले. त्यामुळे पोलिसांनी फक्त त्रास देण्याकरता मराठी भाषिकांवर स्वतःहून गुन्हे दाखल केले होते, हे स्पष्ट झाले, अशा प्रतिक्रिया म. ए. समिती नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दोषमुक्त मराठी कार्यकर्ते
गुन्हा क्र. 122 मधील अर्जुन गोरल, रमेश घाडी, नंदू कुगजी, मारुती देसाई, पिंटू धामणेकर, बसवंत लोहार, श्रीकांत नांदुरकर, सागर काकतकर, अमित जाधव, मनोहर कुंडेकर, विठ्ठल कुरंगी, शंकर कणबरकर, परशुराम कंग्राळकर, अनंत कंग्राळकर, शिवाजी जाधव, प्रशांत कुगजी, अर्जुन चौगले, प्रशांत टक्केकर, परशुराम धामणेकर, अनंत कुंडेकर, मधू कुगजी, कृष्णा काकतकर, अशोक धामणेकर, तानाजी हलगेकर, मारुती गोरल, चांगप्पा हलगेकर, अरविंद पाटील, नारायण काकतकर, श्यामल जाधव, सुधा जाधव, मालन जाधव, कमला पोटे, जयश्री खादरवाडकर, रामचंद्र बागेवाडी, विकास पाटील, सुनील पाटील, सतीश कुगजी अशा 37 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
मात्र सूरज नायकोजी, सतीश जाधव, प्रवीण धामणेकर, नारायण कंग्राळकर, अनंत पाटील, संजय गोरल, प्रशांत जाधव हे कार्यकर्ते सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्यामुळे त्यांना निकालातून वगळण्यात आले आहे. त्यांची सुनावणी स्वतंत्र होईल. तर अरुण येळ्ळूरकर, बाळू मजुकर, शिवाजी काकतकर यांचे निधन झाले आहे.
खटला क्र.126 मधील अर्जुन गोरल, चांगदेव देसाई, अनंत चिठ्ठी, वृषेशन पाटील, संभाजी हट्टीकर, शिवाजी कदम, सुनील धामणेकर, श्रीकांत नांदुरकर, राहुल कुगजी, नागेश बोबाटे, सुनील कुंडेकर, रवळू कुगजी, केशव हलगेकर, गणपती पाटील, नामदेव नायकोजी, केशव पाटील, रमेश धामणेकर, रामचंद्र कुगजी, सतीश कुगजी या 19 जणांची निर्दोष मुक्तता झाली.