बेळगाव

Saundatti News: यल्लम्मा डोंगर अस्वच्छतेच्या विळख्यात

मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव : प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कारदगा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवी मंदिर परिसरात अस्वच्छता, मोकाट जनावरांचा उपद्रव आणि कचऱ्याचे ढीग यामुळे भाविकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे. मंदिर परिसर व यात्रेकरू निवासस्थानी स्वच्छतेचा अभाव जाणवत असल्याने डोंगर परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे.

विविध राज्यांतून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. वर्षभर डोंगरावर मोठी गर्दी असते. कर्नाटक शासनाने देवस्थान विकासासाठी लाखो रुपये खर्च केले असले तरी अपेक्षित सुविधा उपलब्ध झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे विविध समस्यांना भाविकांना सामोरे जावे लागत आहे. मंदिर परिसरात मोकाट जनावरे व कुत्र्यांचा वावर मोठ्याप्रमाणात असून परिसर अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

परशुराम मंदिर व पवित्र जलस्थळाजवळही जनावरांचा वावर असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. मंदिर परिसरात व आजूबाजूला कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. परडी, देवीचा जग, कवड्यांच्या माळा, मोरपीस, देवीचे फोटो पडलेले दिसून येतात. याकडे देवस्थान समिती व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परशुराम यात्रीनिवास व इतर निवासस्थानीही स्वच्छतेचा अभाव असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे.

कोट्यवधींचा निधी खर्च करूनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष व सुविधा अपुऱ्या असल्याची टीका होत आहे. संबंधितांनी तातडीने लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT