बेळगाव

कर्नाटकात भाजप प्रदेशाध्यक्षपदी अशोक किंवा करंदलाजे; येडियुराप्पांचा प्रस्ताव

दिनेश चोरगे

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करलेल्या भाजपला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य आणि जिल्हा कार्यकारिणींची पुनर्रचना केली पाहिजे, असा संदेश ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी पक्षनेतृत्वाला दिला आहे. तसेच पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा माजी उपमुख्यमंत्री आर. अशोक किंवा केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडे सोपवावी, असाही प्रस्ताव त्यांनी दिला आहे.

दिल्लीत येडिंनी सोमवारी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन पुनर्रचनेबाबत चर्चा केली. विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, प्रतोद म्हणून सुनीलकुमार तर विधान परिषदेत विरोधी पक्ष नेतेपदी शशील नमोशी किंवा कोटा श्रीनिवास पुजारी यांच्यावर जबाबदारी सोपवावी, असेही येडिंनी सुचवले आहे.

पराभवानंतर कर्नाटक भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. माजी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य यांनी प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्यावर टीका केली. तर खासदार प्रताप सिम्हा, माजी मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी भाजपच्याच काही नेत्यांवर तडजोडीचे राजकारण केल्याचा आरोप करत काँग्रेसशी संगनमत असल्याचे सूचित केले होते. या वादातूनच भाजपने अद्याप विरोधी पक्षनेताही घोषित केलेला नाही. या घडामोडींतून मार्ग काढण्याची जबाबदारी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी येडियुराप्पांवर सोपवली आहे. वाढता असंतोष शमवा, असे येडिंना सांगण्यात आले आहे. त्यानुसार येडि सोमवारी दिल्लीला पोचले. येडिंनी शहा आणि नड्डांची भेट घेऊन पक्षाला
कर्नाटकात नवा अध्यक्ष हवा असल्याचे सांगितले. ' पराभवातून आलेली मरगळ झटकण्यासाठी आणि कार्यकर्त्यांसह नव्या आमदारांमध्ये चैतन्य आणण्यासाठी नवा नेता निवडणे गरजेचे आहे. त्याकडे राष्ट्रीय नेत्यांनी तातडीने लक्ष द्यावे,' असे येडिंनी या दोघांना सांगितले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या कर्नाटक राज्य आणि सगळ्या जिल्हा कार्यकारिणींची पुनर्रचना झाली पाहिजे. तसेच कर्नाटकातील प्रबळ समुदायांना अधिक महत्त्व दिले पाहिजे, असेही येडिंनी शहा आणि नड्डांना सूचवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT