कारदगा : कलियुगाचा अंत होऊन सत्ययुग येणार आहे. कलियुगात बहीण भावाला, भाऊ बहिणीला ओळखणार नाही. कोयना व कृष्णा नदीच्या काठी 9 लाख बांगड्या फुटतील. ऐकूने ते ऐकशील, बघूने ते बघशीला. सत्याने वागा. सत्याचा विजय आहे. खोटे बोललात तर बुडून जाल. जगात महायुद्धाचा भडका उडेल. सोन्याचा भाव गगनाला भिडेल, अशी भाकणूक कथन गडमुडशिंगी येथील पुजाऱ्यांनी ढोणेवाडी लक्ष्मीदेवीच्या यात्रेमध्ये केली.
भाकणूक करताना गडमुडशिंगी येथील पुजारी म्हणाले, रामराज्य पुन्हा येणार असून छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील. भगवा झेंडा राज्य करेल. जगात तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल. ढोणेवाडीवर माझी छाया आहे. लक्ष्मीची भक्ती करा. सोन्याचा भाव गगनाला भिडेल. लाकूड, तांबे व पितळ महाग होईल. पाऊस गैरहंगामी होईल. उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात उन्हाळा येईल. साधेल तो शहाणा ठरेल. तंबाखूचे प्रमाण वाढेल. उसाला चांगली किंमत मिळेल. गहू महाग होईल. पिके उदंड येतील.
शेतजमिनींचे महत्त्व वाढेल. मळा माळ होईल आणि माळ मळा होईल. शेती सोन्यासारखी मौल्यवान होईल. तिचे जतन करा. माणूस स्वार्थासाठी माणुसकी विसरेल. रोगराई वाढेल. एक दिवस अचानक अंधार पसरून सर्वत्र हाहाकार माजेल. आकाशातील तारे कोसळतील. धर्माच्या नावावर भांडणे होतील. रक्तपात होईल. कळपातील बकरा कळपातच लढेल. पशुपक्षी व जनावरांच्या किमती वाढतील. बसवण (बैल) नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आईला लेकरू ओळखणार नाही. गाईला वासरू भेटणार नाही. कलियुगाचा शेवट होऊन जग विनाशाकडे जात आहे. सत्ययुग येणार आहे, अशी भाकणूक गडमुडशिंगी येथील पुजाऱ्यांनी केली.
प्रारंभी हेडाम खेळ झाल्यानंतर भाकणूक सांगणाऱ्या पुजाऱ्यांची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. धनगर समाजाच्या बांधवांनी ढोलवादन करून संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. भंडारा व खोबऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.