बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
म्हैसूर राजवाड्यामध्ये शुक्रवारी (दि. 11) यदुवीरराजे वडेयर यांनी पारंपरिक पद्धतीनुसार आयुध पूजा झाली. शनिवारी (दि. 12) परंपरेनुसार दसरोत्सव साजरा केला जाणार आहे. आकर्षक ‘जम्बो सवारी’होणार असून, यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. त्यानंतर गेले दहा दिवस चाललेल्या या उत्सवाची सांगता होणार आहे. राजघराण्यातील वंशज वापरत असलेली शस्त्रे सकाळी सोमेश्वर मंदिराकडे नेली. तेथे ती स्वच्छ करण्यात आली. तेथून पालखीतून वाद्यांच्या गजरात ती पूजेच्या ठिकाणी आणण्यात आली. त्याआधी सकाळी चंडिका होम करण्यात आला. त्यानंतर हत्तीच्या दरवाजातून गायीचा प्रवेश झाला. 8 वाजता आयुध आणण्यात आले. 9 वाजता चंडिका होम पूर्णाहुती देण्यात आली. दुपारी 12.20 वाजता यदुवीर राजेंनी आयुधपूजा केली. विविध प्रकारची शस्त्रे, वस्तू, महागड्या कारचे पूजन केले. सायंकाळी रत्नजडीत सिंहासनावरुन त्यांनी खासगी दरबार चालवला. त्यानंतर जोडलेल्या सिंहासनाचे डोके विसर्जित करण्यात आले.
दसरोत्सवामध्ये जम्बो सवारी म्हणजे हत्तीवरुन देवीच्या अंबारीची काढलेली मिरवणूक आकर्षक असते. यंदा 750 किलोचा सोन्याचा अंबारी, त्यामध्ये चामुंडेश्वरी देवीची मूर्ती वाहून नेण्याचा मान ‘अभिमन्यू’ हत्तीला मिळाला आहे. अंबाविलास राजवाड्यातील बलराम दरवाजानजीक दुपारी 1.41 ते 2.10 या काळात मुख्यमंत्री सिद्धरामय्या नंदी ध्वजाची पूजा करून ऐतिहासिक मिरवणुकीला सुरुवात होईल. विविध जिल्ह्यांतील कलाकार कला सादर करतील. आकर्षक चित्ररथांसह बन्नीमंटपापर्यंत 5 कि. मी. अंतर मिरवणूक होईल. दुपारी 4 वाजता यदुवीरराजे वडेयर आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या चामुंडेश्वरी देवीला पुष्पार्पण करुन ‘जम्बो सवारी’ला चालना देतील.
गेल्या दहा दिवसांपासून पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या दसरोत्सवाची सांगता शनिवारी विजयादशमीच्या मिरवणुकीने होत आहे. यासाठी देश-विदेशातील लाखो लोक म्हैसूरनगरीत दाखल झाले आहेत. दसरोत्सवानिमित्त संपूर्ण म्हैसूरनगरीत गल्लोगल्ली सजावट करण्यात आली आहे. गेल्या नऊ दिवसांत धार्मिक आणि मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. अन्नोत्सव, फळ-पुष्प प्रदर्शन, रयत दसरा, महिला दसरा, युवा दसरा, मुलांचा दसरा, कवी संमेलन असे विविध कार्यक्रम पार पडले.