बेळगाव : विस्तवावर धूप घालून तो अधिक पेटावा म्हणून त्यावर सॅनिटायझर ओतले; परंतु अचानक आग भडकल्याने उरलेले सॅनिटायझर महिलेच्या अंगावर पडले. यामुळे आग लागून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. नूतन अरविंदकुमार हट्टीकर (वय 36, रा. नववा क्रॉस, दैवज्ञ स्कूलजवळ, शास्त्रीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत शहापूर पोलिसांची माहिती अशी : दि. 6 मे रोजी रात्री दहाच्या सुमारास नूतन या घरात धूप पेटवत होत्या. यावेळी थोडा अधिक धूर यावा म्हणून त्यांनी त्यावर सॅनिटायझर ओतले. यावेळी त्यावर जादा सॅनिटायझर पडल्याने प्लेटमध्ये आग भडकली. यावेळी घाबरलेल्या नूतन यांनी सॅनिटयझरची बाटली आपल्या अंगावर ओतून घेतली. यावेळी प्लेटमध्ये लागलेली आग व अंगावरील गाऊनवर पडलेल्या सॅनिटायझरने पेट घेतला. यामध्ये त्यांचा चेहरा, पोट, खांद्यांना गंभीर भाजले.
त्यांना उपचारासाठी हुबळीच्या किम्स् हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथून त्यांना 7 जून रोजी घरीही जाऊ दिले; परंतु घरी आल्यानंतर शनिवारी सकाळी 9.45 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचे पती अरविंदकुमार शिवाप्पा हट्टीकर यांनी शहापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. निरीक्षक एस. एस. सीमानी तपास करीत आहेत.