चिकोडी : अनैतिक संबंध ठेवू नको अशी समजूत काढणार्या जावेचा खून केलेल्या महिलेला व तिच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा व दोन लाख दहा हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा येथील सातवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
सुधा सुरेश करिगार (वय 32) व रामप्पा उर्फ रमेश केंचप्पा बस्तवाडे (वय 25, दोघे रा. बेल्लद बागेवाडी, ता. हुक्केरी) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चिकोडी येथील सातव्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. तारकेश्वरगौडा पाटील यांनी शिक्षा सुनावली असून सरकारच्या बाजूने सरकारी वकील वाय. जी. तुंगळ यांनी काम पाहिले. बेल्लद बागेवाडी येथील सुधाचे गावातील रामाप्पा याच्याबरोबर अनैतिक संबंध होते. तिची जाऊन भाग्यश्री चन्नप्पा करिगारला त्यांच्या अनैतिक संबंधाविषयी समजले होते. याविषयी तिने पती चन्नप्पाला सांगितले होते. तसेच सुधाला अनैतिक संबंध ठेवू नको, असे समजावून सांगितले होते.
भाग्यश्री अनैतिक संबंधाबाबत बाहेर वाच्यता करेल, या भीतीतून सुधाने भाग्यश्रीला संपविण्याचा निर्णय घेतला. याविषयी तिने रामाप्पा याच्याकडून सल्ला घेतला. भाग्यश्री झोपली असताना तिचा गळा दाबून खून करून जाळून टाक, असा सल्ला त्याने सुधाला दिला होता. त्यानुसार 9 डिसेंबर 2019 रोजी भाग्यश्रीचा पती साखर कारखान्यात कामाला गेला होता. सुधाचा पतीही बाहेरगावी गेला होता. घरामध्ये सुधा व भाग्यश्री दोघीच होत्या. रात्री दोनच्या दरम्यान सुधाने भाग्यश्रीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघींमध्ये झटापट झाली. सुधाने शेजारी असलेल्या विळाने भाग्यश्रीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला. त्यानंतर तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन साक्षी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी हुक्केरी पोलिस स्थानकात नोंद होऊन पोलिस निरीक्षक कल्याण शेट्टी यांनी तपास केला. खून झालेल्या भाग्यश्रीच्या हातामध्ये केस आढळून आले होते. सदर केस लॅबोरेटरीला पाठवून तपासले असता सुधाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सुधाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने खून केल्याचे कबूल केले.