बंगळूर : ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यावर नियंत्रणासाठी पोलिस खात्याच्या सायबर क्राईम विभागाने 1930 या साहाय्यवाणीसह वेबबॉट विकसित केल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक अलोक मोहन यांनी दिली.
महात्मा गांधी रस्त्यावरील एडीजीपी सीएल व एम कॉर्नर हाऊस कार्यालयात त्यांनी विकसित साहाय्यवाणी व वेब बॉटचे उद्घाटन केले. त्यानंतर ते बोलत होते. राज्यात 1930 या क्रमांकावर 2022 मध्ये संपर्क साधलेल्यांची संख्या 1.30 लाख इतकी आहे. 2024 मध्ये 8.26 लाख आणि 2025 च्या पहिल्या त्रैमासिकात 4.34 लाखांवर गेली आहे. दरवर्षी हा आकडा वाढतच असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यामध्ये सध्या ऑनलाईन व्यवहारांत वाढ झाली आहे. त्या मानाने ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. अशा गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी सायबर गुन्हे साहाय्यवाणी 1930 सुरु करण्यात आली होती. या साहाय्यवाणीसह आता वेब बॉट विकसित केले आहे. जलद प्रतिसाद केंद्र, अतिरिक्त पोलिस महासंचालक, संपर्क, आणि आधुनिकीकृत कार्यालयाच्या आवारात साहाय्यवाणी सुरु केली आहे. या ठिकाणी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलद्वारे फसवणूक प्रकरणांची नोंद केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
दिवसेंदिवस फसवणूक वाढत आहे. साहाय्यवाणीवर अनेक कॉल्स येतात. काही कॉल्स वेळेअभावी उचलता येत नाहीत. आपल्या तक्रारीच्या तपासाची स्थिती जाणून घेण्यासाठीही काहीजण कॉल करतात. विविध प्रकारची माहिती, तक्रारी करण्यासाठी त्यांचे वर्गीकरण करण्याची व्यवस्था केली आहे. कॉल केल्यानंतर आयव्हीआर व्यवस्थेद्वारे त्याचे वर्गीकरण होते. वेळेत तपास हाती घेणे त्यामुळे सुलभ होते. व्हॉईस गाईडेड वेबबॉट व्यवस्था जारी केली आहे. तक्रार दाखल करण्यासाठी वेबबॉटचे लिंक पीडितांना एसएमएसद्वारे पाठवले जाते. 2022 मध्ये 113 कोटींची फसवणूक झाली होती. 2024 मध्ये हा आकडा 2,396 कोटींवर गेला. 2022 मध्ये 1930 वर संपर्क साधल्यानंतर 8 कोटींची फसवणूक थांबवणे शक्य झाले. 2024 मध्ये 226 कोटींची फसवणूक टाळणे शक्य झाल्याची माहितीही अलोक मोहन यांनी दिली.
विविध प्रकारच्या सुधारणांमुळे 1930 या क्रमांकावर अधिकाधिक कॉल स्वीकारणे आता शक्य होणार आहे.
इंग्रजी, कन्नड, हिंदी भाषेत तक्रार दाखल करता येते.
1930 हा क्रमांक व्यस्त असेल तर रांगेत असणार्या आपल्या कॉलच्या स्थितीची माहिती दिली जाते.
सोशल मीडिया अकाऊंट हॅकच्या तक्रारीसाठी लिंक दिली जाते. त्यावर तक्रार दाखल करता येते.