बंगळूर; प्रतिनिधी / वृत्तसंस्था : गेल्या 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आळंद विधानसभा मतदारसंघात झालेल्या कथित व्होटचोरी प्रकरणाची चौकशी करणार्या विशेष तपास पथकाने भाजपचे माजी आमदार, त्यांचा मुलगा आणि एका निकटवर्तीयासह सातजणांविरुद्ध तब्बल 22 हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. बंगळूर येथील प्रथम अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकार्यांसमोर हे आरोपपत्र सादर करण्यात आले असून, यात 5,994 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याच्या आरोपांचा समावेश आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपपत्र 22,000 हून अधिक पानांचे असून, मतदारांची नावे वगळण्यासाठी वापरलेल्या कार्यप्रणालीचा तपशील यात देण्यात आला आहे. आरोपपत्रात आळंदचे चारवेळा आमदार राहिलेले सुभाष गुत्तेदार, त्यांचा मुलगा हर्षानंद, त्यांचे खासगी सचिव टिप्परुद्र, गुलबर्गा येथील तीन डेटा सेंटर ऑपरेटर्स अक्रम पाशा, मुकरम पाशा आणि मोहम्मद अशफाक आणि पश्चिम बंगालमधील बापी आद्य यांचा समावेश आहे. आद्य या व्यक्तीला या प्रकरणात सर्वप्रथम अटक करण्यात आली होती. त्याने ओटीपी बायपास नावाची वेबसाईट चालवली होती, जी अमेरिकेतील एका प्लॅटफॉर्मशी जोडलेली होती आणि ओटीपी बायपास सुविधा पुरवत होती. त्याला नंतर जामीन मिळाला.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कथित मतचोरीविरुद्ध राज्यव्यापी अभियान शहराच्या फ्रीडम पार्क येथून सुरू झाले आहे. याशिवाय मतचोरीविरोधात रविवारी (दि. 14) दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य निषेध रॅली काढली जाईल. तीत हजारो लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष या नात्याने राज्याच्या सहभागींसाठी राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांची आहे. ते म्हणाले, लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याचा आम्हाला विश्वास आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या आंदोलनाचे आयोजन केले आहे, तर अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे या अभियानाचे नेतृत्व करत आहेत. आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी तिथे जात आहोत.
एक नजर...
1) विशेष तपास पथकाने भाजपचे माजी आमदार सुभाष गुत्तेदार यांच्यासह सातजणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
2) आरोपपत्र 22,000 हून अधिक पानांचे असून, त्यात 5,994 मतदारांची नावे वगळल्याचा आरोप आहे.
3) या प्रकरणात ओटीपी बायपास नावाची वेबसाईट चालवणार्या बापी आद्य याला सर्वप्रथम अटक करण्यात आली होती.
4) उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मतचोरीविरुद्ध दिल्लीत भव्य रॅली काढण्याची घोषणा केली आहे.