बेळगाव ः केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी लागू केलेल्या योजना सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून ‘व्हिजन कर्नाटक-2025’ या नावाने भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रदर्शन बुधवार (दि. 11) ते शुक्रवारपर्यंत (दि. 13) असे तीन दिवस केएलई सेंटेनरी कन्व्हेशन हॉलमध्ये सकाळी 10 ते 5 पर्यंत चालणार आहे, अशी माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली. ते सोमवारी (दि. 9) एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्यामुळे गरिबांना मोठा आधार मिळाला आहे. जनधन, आयुष्यमान भारत, जनकल्याण यासह शेतकर्यांसाठीही हितकारक योजना राबविल्या आहेत. मात्र, या योजनांबाबतची माहिती त्यांच्यापर्यंत पोचविणे गरजेचे आहे. यासाठीच स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून तीन दिवसाचे माहिती प्रदर्शन भरविण्यात येत आहे. बँकेच्या माध्यमातून देण्यात येणार्या कर्ज योजनांसह सरकारी योजनांमध्ये असलेल्या त्रूटी दूर करण्यासाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून विचारविनिमय करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वसामान्य जनतेसाठी या योजना राबवल्या जात आहेत. त्याची माहिती जनतेपर्यंत जाणे महत्त्वाचे आहे. यासाठीच हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. प्रदर्शन सर्वांना मोफत असून सर्वसामान्य जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार शेट्टर यांनी केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, गीता सुतार, माजी आमदार अनिल बेनके, संजय पाटील, मुरगेंद्रगौडा पाटील, अॅड. एम. बी. जिरली, डॉ. रवी पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर करवून आणला आहे. त्यात रिंगरोड, बायपास, एसटीपी, बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाचा समावेश आहे. येत्या काही वर्षांत ही कामे पूर्ण होतील. रिंगरोडचे काम पाच टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी भूसंपादन सुरु असून निधीही मंजूर झाला आहे. बंगळूर ते बेळगाव स्वतंत्र वंदे भारत रेल्वेला मंजुरी मिळाली आहे. त्यालाही लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती खासदार शेट्टर यांनी दिली.