जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी पत्रकार परिषदेत बोलताना  Pudhari
बेळगाव

Nandi Sugar Factory Scam | नंदी साखर कारखान्यातील 12.33 कोटींचा कथित ऊस वजन घोटाळा उघड; आठ आरोपी अटकेत

11.32 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त व गोठविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली

पुढारी वृत्तसेवा

Vijayapur Nandi Sahakari Sakhar Karkhana

विजयपूर : नंदी साखर कारखान्यात ऊस वजनाच्या नोंदींमध्ये कथित बनावट व्यवहार करून तब्बल 12.33 कोटींचा अपहार केल्याचा प्रकार बबलेश्वर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, 11.32 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त व गोठविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.

या प्रकरणी 12 जून 2026 रोजी बबलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 29/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदी साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक अशोक संगप्पा टिप्पारेड्डी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, ऊस वजन विभागातील कर्मचारी धरेप्पा दुंडप्पा नावी व इतरांनी संगनमताने 2020-21 ते 2025-26 या सहा गाळप हंगामांदरम्यान बनावट टोकन आणि बोगस बिले तयार करून शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सखोल तपासात घोटाळ्याचा पर्दाफाश

अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामनगौडा हत्ती आणि ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी टी. एस. सुल्फी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रमेश अवजी यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने कारखान्यातील ऊस वजन केंद्राच्या नोंदींची तपासणी केली. तपासात वजन मापन प्रक्रियेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मदतीने बनावट टोकन तयार करून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वजनाशी त्यांची सांगड घालण्यात येत होती. त्याआधारे बोगस बिले तयार करून आर्थिक अपहार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

तपासादरम्यान बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांमध्येही अशाच प्रकारची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, विजयपूर जिल्ह्यातील नंदी साखर कारखान्यातही त्याच पद्धतीचा वापर झाल्याचे समोर आले आहे.

सहा वर्षांत 12.33 कोटींचा कथित अपहार

पोलिसांच्या तपासानुसार, 2020-21 ते 2025-26 या कालावधीत आरोपींनी सुमारे 34,490.699 मेट्रिक टन ऊसाचे वजन कृत्रिमरीत्या वाढवून 91 विविध बँक खात्यांमध्ये 12,33,22,793 इतकी रक्कम वर्ग करून अपहार केल्याचा आरोप आहे.

11.32 कोटींची रक्कम जप्त

मुख्य आरोपी धरेप्पा दुंडप्पा नावी याच्याकडून 21 लाखांची रोख रक्कम, त्याच्या बँक खात्यातील 4.80 कोटी, तसेच इतर खात्यांमध्ये वर्ग झालेली 5.48 कोटी अशी एकूण 10.50 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याशिवाय विविध बँक खात्यांतील 82.07 लाखांची रक्कम गोठविण्यात आली असून, एकूण 11.32 कोटींची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

आठ आरोपी अटकेत

या प्रकरणात धरेप्पा दुंडप्पा नावी, भीरप्पा गाडदार, यल्लप्पा गाडदार, प्रकाश गड्डी, परमानंद गड्डी, महादेव कांबळे (सिंगे), बाळप्पा चोपडे आणि प्रभाकर सिंगे या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

तपास पथकाचा गौरव

अल्पावधीत कोट्यवधी रुपयांच्या या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश करून आरोपींना अटक करणाऱ्या विशेष तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याची जिल्हा पोलीस विभागाने दखल घेत त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT