विजापूर : कुत्रा चावल्यानंतर रेबीज प्रतिबंधक लस न घेतल्याने जिल्ह्यातील निडगुंदीजवळील गोळसंगी गावातील युवकाचा मृत्यू झाला. प्रदीप चंद्रशेखर हळेरोळी असे मृताचे नाव आहे.
3 महिन्यांपूर्वी तो बिळगी तालुक्यातील मण्णीकेरी गावातील यात्रेला गेला असताना त्याला कुत्र्याने चावल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्याने रेबीज प्रतिबंधक लस घेतली नव्हती. त्याच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याने त्याला बागलकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
कुत्रा चावल्यानंतर तत्काळ वैद्यकीय उपचार आणि रेबीज प्रतिबंधक लस घेणे महत्त्वाचे आहे. कुत्रा चावल्यानंतर दुर्लक्ष न करता त्वरित रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.