विजापूर : जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील हत्तळी गावाजवळील बोरी ओढा आटल्यामुळे पाण्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत. अनेक प्राणी व पक्षांचा मृत्यू झाला असून तहान भागवण्यासाठी प्राणी, पक्षी पाण्यासाठी भटकताना दिसत आहेत. ओढ्यात पाणी नसल्याने खालच्या भागात साचलेल्या दूषित पाण्यात मासे व इतर जलचर प्राणी मृतावस्थेत आढळून आले आहेत.
उन्हाळ्यात ओढा पूर्णपणे कोरडा पडल्याने परिसरात मोर, बदके, साप यांसह विविध पक्षी व प्राण्यांचे मृतदेह आढळत आहेत. ओढ्यात साचलेले पाणी दुर्गंधीयुक्त व दूषित झाले असून ते पिणाऱ्या पक्षी व प्राण्यांचा मृत्यू होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे तहान भागवण्यासाठी पक्षांना ओढ्यातील साचलेले पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पक्षी व प्राण्यांचे मृत्यू वाढत आहेत.
ओढ्याची देखभाल, स्वच्छता व पाणी संवर्धनाबाबत कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही नागरिकांच्या मते, शेतकऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमुळे किंवा जवळील औद्योगिक प्रदूषणामुळेही ही घटना घडली असावी. पण मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.वन विभाग, पर्यावरण विभाग व पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे व मृत पक्षांचे नमुने तपासावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाअभावी यंदा ओढे भरले नाहीत. उपलब्ध असलेले पाणीही आटल्याने भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. जनावरे पाण्यासाठी भटकत आहेत.