विजापूर : विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील एका गावात रविवारी (दि. 8) दुपारी रेड बर्ड प्रायव्हेट जेट विमान कोसळले. त्यात पायलट आणि प्रशिक्षणार्थी पायलट जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुलबर्ग्याहून बेळगावला जात असताना इंधन संपल्याने विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. रेड बर्ड प्रायव्हेट जेट अपघातग्रस्त होऊन एका शेतकऱ्याच्या शेतात कोसळले. जेटमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांबरा येथील रेड बर्ड एव्हिएशन नावाच्या उड्डाण प्रशिक्षण संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सेस्ना 172 टँगो चार्ली लाईट विमानात कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी पायलट कुणाल शंकर होते. या घटनेत ते जखमी झाले आहेत. त्यांना विजापूर येथील बीएलडीई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बबलेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास चालवला आहे. इंधन संपल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नाही. पोलिस त्याचा तपास करत आहेत.