Husband kills wife : पत्नीची हत्या करून मृतदेह पुरला अंगणात!  Pudhari
बेळगाव

Husband kills wife : पत्नीची हत्या करून मृतदेह पुरला अंगणात!

पतीला अटक : पैसे देण्यास नकार दिल्याने दांडक्याने प्रहार

पुढारी वृत्तसेवा

विजापूर, अंकली : पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह अंगणात पुरून वर ती बेपत्ता असल्याचा बनाव तब्बल 24 दिवसांपासून करणाऱ्या खुनी पतीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. प्रभू रत्नाकर (वय 46) असे पतीचे नाव असून, सरोजनी रत्नाकर (वय 45) असे मृत पत्नीचे नाव आहे. प्रभूला पोलिसांनी बंगळूरमधून अटक केली. त्याने 23 जानेवारीरोजी पैशावरून वाद झाल्यानंतर सरोजनीचा खून केला होता. त्याच रात्री मृतदेह घराच्या अंगणात पुरला होता.

विजापूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी गावात कंत्राटदार असलेल्या पतीचा हा बनाव शनिवारी उघडकीस आला. अंगावर काटा आणणारे वास्तव समोर येताच पोलिसही चक्रावले. 24 जानेवारीरोजी प्रभूने सरोजनीची हत्या केली होती. त्यानंतर त्याने देवर हिप्परगी पोलिस ठाण्यात 2 फेब्रुवारीरोजी 24 जानेवारीला खरेदीसाठी बाहेर गेलेली पत्नी परत आली नाही, अशी तक्रार दाखल केली होती.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रभूने एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे बनाव रचला. एक गाडी भाड्याने घेऊन पत्नीला शोधण्यासाठी तो थेट बंगळूरला गेला. तिथल्या लॉजमध्ये मुक्काम करून पत्नीचा शोध घेत आहे, असे तो पोलिसांना भासवत होता. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी गाडीच्या ड्रायव्हरकडे चौकशी केली. त्याने माहिती दिली की, प्रभू लॉजमधून बाहेरच पडत नाही. शिवाय, पोलिसांना तपासावेळी सरोजनीचा मोबाईल फोन घरातच सापडला. त्यामुळे प्रभूवरील संशय अधिक बळकट झाला.

सासऱ्याचा मृत्यू

14 फेब्रुवारीरोजी सरोजनीच्या आजारी वडिलांचे निधन झाले. पण प्रभू त्यांच्या अंत्यविधीलाही गेला नाही. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी त्याला बंगळूरमधून ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

घराच्या अंगणातील 5 बाय 3 फुटांच्या जागेतून पोलिसांनी सरोजनीचा मृतदेह बाहेर काढला. सरोजनीची आई कमलाव्वा मेलिनमनी यांच्या तक्रारीवरून प्रभू रत्नाकरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार कंत्राटदार प्रभू रत्नाकर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT