बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान हाेणार आहे. वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठीचे क्षेत्र बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्हा आहे. सकाळी आठ वाजता मतदानास प्रारंभ झाला असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मास्कची सक्ती करण्यात येत आहे.
वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. 'शिक्षक'साठी 12, तर 'पदवीधर'साठी 11 असे एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिक्षकसाठी 25 हजार 388, तर पदवीधरसाठी 99 हजार 598 असे एकूण 1 लाख 24 हजार 986 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रिंगणात 23 उमेदवार असले, तरी खरी लढत ही भाजप- काँग्रेसच्या चार उमेदवारांमध्येच दिसून येत आहे.
बेळगाव येथील सरदार हायस्कूलमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. टिळकवाडी येथील शिक्षिका नंदेकला बिरादार यांचे शिक्षक मतदारसंघाचे मतदान टिळकवाडी येथील आदर्श बाँईज स्कूल केंद्रावर तर पदवीधरचे मतदान सरदार हायस्कूल केंद्रावर असल्याने काही काळ मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.