बेळगाव : महिनाभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर आता महापौर व उपमहापौर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे प्रादेशिक आयुक्तांनी अपात्र ठरविलेले मंगेश पवार हे महापौरपदासाठी आणि उपमहापौरपदासाठी सविता पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.
महापालिकेच्या सभागृहात शनिवारी (दि. 15) सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत महापौर, उपमहापौर निवडणूक होणार आहे. प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर यांनी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यांनी अपात्र ठरवलेल्या मंगेश पवार आणि जयंत जाधव यांना पुन्हा मतदानाचा आणि महापौर, उपमहापौर निवडणुकीत अर्ज करण्याचा अधिकार मिळाला आहे. उच्च न्यायालयाने तात्कालिक स्थगिती देऊन दोघांनाही नगरसेवकपद बहाल केले आहे. त्यामुळे, महापालिकेत मतदारांची संख्या पुन्हा 65 वर पोचली आहे.
महापालिकेत भाजपचे सर्वाधिक 35 नगरसेवक आहेत. तर दोन नगरसेवकांचा पाठिंबा असून एक आमदार, एक विधान परिषद सदस्य आणि एका खासदाराचे मत त्यांच्याकडे आहे. त्यामुळे, सभागृहात भाजपला स्पष्ट बहुमत आहे. यंदा महापौरपद खुल्या वर्गासाठी आणि उपमहापौरपद खुल्या गटातील महिला वर्गासाठी राखीव आहे. महापौरपदासाठी तिघांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये मंगेश पवार, राजू भातकांडे आणि नितीन जाधव यांचा समावेश आहे. तर उपमहापौरपदासाठी पाच नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत. महापौरपद मंगेश पवार यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर झालेली अपात्रतेची कारवाई, त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडी यामुळे पवारच यावेळी महापौर असतील, असा कयास बांधला जात आहे. तर उपमहापौरपदासाठी सविता पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.