निपाणी : मधुकर पाटील
मराठी साहित्य विश्वातील ज्येष्ठ साहित्यिक माने प्लॉट येथील रहिवासी महादेव विठ्ठल मोरे (वय ८६) यांचे आज (बुधवार) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या ५० वर्षांपासून त्यांनी मराठी साहित्य विश्वामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्य सरकारकडून विविध क्षेत्रातील अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले होते. विशेष म्हणजे दै. पुढारी मध्ये त्यांनी अनेक वर्ष बहार या साप्ताहिक पुरवणीसाठी चेहऱ्यामागचे चेहरे या विषयावर लिखाण केले होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, मराठीतील एक अभिजात साहित्यिक हरपला आहे.
साहित्यिक महादेव मोरे यांना महाराष्ट्र शासनाने चिताक या कथासंग्रहासाठी पुरस्कार देऊन गौरवले होते. विशेष म्हणजे त्यांनी आशिया खंडात गाजलेल्या तंबाखू आंदोलनावर झोंबड हा कथासंग्रह लिहिला होता. अर्थात हा कथासंग्रह गाजला गेला. या शिवाय त्यांनी एकोणीसावी जमात हेही कथासंग्रह लिहिले होते. त्यांचे आतापर्यंत १६ कथासंग्रह, कादंबऱ्या, ४ ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना सातारा प्रतिष्ठानच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
त्यांचे सीमाभागासह कर्नाटक व महाराष्ट्रातील ज्येष्ठ तसेच नवख्या साहित्यिकांशी घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त निपाणीनगरीच्यावतीने झालेल्या सत्कारप्रसंगी त्यांना ज्येष्ठ साहित्यिक परिवर्तनवादी नेते प्रा. डॉ. अच्युत माने यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. दरम्यान महाराष्ट्राचे तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकाळात माजी आ.काकासाहेब पाटील यांनी त्यांना घरकुलासाठी २ लाखाचे अनुदान मिळवून दिले होते. त्यातुन साकारलेल्या विश्वास या निवासस्थानी पिठाच्या गिरणीसह सध्या माने प्लॉटमध्ये वास्तव्यास होते.
गेल्या ४० वर्षापासून ते पिठाची गिरणी चालवित होते. त्यांचे उभे आयुष्य पिठाच्या गिरणीमध्ये गेले. अपेक्षित व कष्टकऱ्यांचे कोणी नव्हते अशा परिस्थितीत महादेव मोरे यांनी उपेक्षितांचे जगणे साहित्यामध्ये मांडले. दि.२२ जून रोजी त्यांचा ८५ वा वाढदिवस साजरा झाला होता. बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघालेल्या अंत्ययात्रेत कर्नाटक व महाराष्ट्रातील साहित्यिकांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, व्यापार, उद्योग, कृषी यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आ. शशिकला जोल्ले माजी आ.काकासाहेब पाटील, सुभाष जोशी, राजन गवस यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात आठ भाऊ, तीन बहिणी, तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.
महादेव मोरे यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. गेल्या ४० वर्षापासून ते पिठाची गिरण चालवित होते. अंगावर नेहमी पांढरा शर्ट, डोक्यावर पांढरी टोपी, पायजमा व पायात साधे स्लीपर असे त्यांचे राहणीमान होते. त्यांनी साधे जगणे जगत उपेक्षित व कष्टकऱ्यांचे जगणे साहित्यातून सुकर केले.
मराठी साहित्य विश्वात महादेव मोरे हे नाव जरी असले त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत आपला गिरणी व्यवसाय सुरूच ठेवला. त्यांना कितीही मोठे पुरस्कार मिळाले तरी, त्यांनी शेवटपर्यंत पिठाची गिरण हा व्यवसाय बंद ठेवला नाही. अशा एका वस्त्रत साहित्यिकाला आपण सर्वजण मुकलो आहोत.