निपाणी : निपाणी परिसराला शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. हा झालेला पाऊस रब्बी पेरणीसाठी उपयुक्त ठरला असून, गळीत हंगामासाठी नुकसानकारक ठरला आहे. मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
यंदा पावसाने कहर केला असून, गेल्या सहा महिन्यांपासून पाऊस सुरूच आहे. त्यामुळे शेती व्यवसायात अस्थिरता निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे यंदा शेतकरी वर्गाला खरीप हंगाम साधता आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा सलग दोनवेळा पूर आल्याने नदी काठावरील पीकक्षेत्र ओस पडले आहे. कमी-अधिक प्रमाणात साधलेला खरीप हंगामही सततच्या पावसाने वाया गेला असून, एकरी सोयाबीन व भुईमूग क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. यंदाच्या हंगामात झालेला पाऊस ऊस पिकासाठी लाभदायी ठरला असला, तरी इतर दैनंदिन वापरासाठी असणाऱ्या कडधान्यासह इतर पिकांसाठी हा पाऊस त्रासदायक ठरला आहे.
शुक्रवारी दुपारी परिसराला पावसाने झोडपून काढले. सध्या शिवारात खरीप हंगामातील सुगीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, रब्बी हंगामातील शाळू, गहू, हरभरा यासह कांदा पिकांच्या पेरणी कामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला असला, तरी अंतिम टप्प्यात आलेली सुगी तसेच गळीत हंगामाला नुकसानकारक ठरला आहे.