बेळगाव

बंगळूर : निवडणूक घोषणेनंतर उमेदवारांची यादी

मोहन कारंडे

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तयारी, उमेदवारांची निवड, प्रचाराची रणनीती या प्रमुख विषयांवर राज्य भाजप कोअर कमिटीच्या सदस्यांबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेऊन चर्चा केली. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा निर्णय या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

बिदर दौर्‍यावरून आलेल्या अमित शहा यांनी विधानसौधसमोर उभारण्यात आलेल्या बसवेश्वर आणि केंपेगौडा यांच्या प्रतिमेचे अनावरण करून पंचतारांकित हॉटेलमध्ये कोअर कमिटी सदस्यांची बैठक घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार जिल्हा समितीकडून तीन नावे घेण्यात आली आहेत. राज्य समितीकडून ही नावे निरीक्षणासाठी अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या बैठकीत ठेवण्यात आली. यावर बराच वेळ चर्चा करण्यात आली. बहुतांश मतदारसंघांतील उमेदवारांची निवड निश्चित करण्यात आली. ही यादी हायकमांडला पाठवण्याची सूचना अमित शहा यांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी विद्यमान आमदारांपैकी किती जणांना तिकीट द्यावे व कोणत्या मतदारसंघात नव्यांना संधी देण्यात यावी. आमदार नसलेल्या मतदारसंघात यावेळी कोणत्या उमेदवाराला स्थान द्यावे, पराभव झालेल्या उमेदवारांना की नवीन उमेदवारांना तिकीट द्यावे, यावरही चर्चा करण्यात आली. सत्ताधारी पक्षातीलच काहीजणांकडून विरोधी भूमिका घेण्यात येत असल्याने त्यांना तिकीट द्यावे की नको, यावरही चर्चा करण्यात आली. भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍या नेत्यांच्या उमेदवारीबाबतही चर्चा करण्यात आली असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बैठकीला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, राज्य भाजप प्रभारी अरुण सिंग, राज्य निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री आर, अशोक, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष आदी नेते उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT