बेळगाव : भुयारी गटारवाहिनी घालण्यासाठी खोदकाम सुरू असताना 20 फुटांपर्यंत खोदलेल्या चरीत माती कोसळून काका आणि पुतण्याचा गुदमरून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गानजीक न्यू गांधीनगरजवळ ही दुर्दैवी घटना घडली.
बसवराज दशरथ सरवे (वय 42) व त्यांचा पुतण्या शिवलिंग मारुती सरवे (वय 20, दोघेही रा. पटगुंदी, ता. मुडलगी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. माळमारुती पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरात अनेक ठिकाणी सध्या भुयारी गटारीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी जुनी पाईप काढून नव्याने घालण्यात येत आहे. महापालिकेने या कामाचे कंत्राट पुण्याच्या कंपनीला दिलेले आहे. त्यानुसार न्यू गांधीनगर येथे भुयारी गटारीचे काम सुरू आहे. त्यासाठी जेसीबीने सुमारे सोळा फूट खोल खोदाई करण्यात आली. त्यानंतर जुनी पाईप मजुरांद्वारे काढण्याचे काम सुरू होते. पाईप काढण्यासाठी शिवलिंग व बसवराज यांच्यासह अन्य काही मजूर चरीत उतरले होते. ते सगळेजण कचर्याने भरलेली पाईप मोकळी करत असताना वरच्या बाजूची भुसभुशीत झालेली माती चरीत कोसळली. त्याखाली काका-पुतण्या तब्बल चार फूटहून अधिक मातीखाली गाडले गेले.
तातडीने मातीचे ढिगारे हटवण्याचे काम सुरू झाले. आधी जेसीबीने नंतर मजुरांनी फावड्यांनी माती बाजूला सारली. मोठ्या संख्येने जमलेल्यां लोकांनी बचावकार्यात मदत केली. पण तोपर्यंत दोघेही बेशुद्ध झाले होते. अर्ध्या तासाच्या कसरतीनंतर दोघांना बाहेर काढण्यात आले जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच माळमारुती ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनीही बचावकार्यात मदत केली. मात्र दोघांना वाचवण्यात अपयश आले.
घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. ती पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. माळमारुती ठाण्यात नोंद झाली असून कालीमिर्ची तपास करीत आहेत.