Nipani Mahalakshmi Devi palkhi: उदे गं आई उदेचा अखंड गजर Pudhari
बेळगाव

Nipani Mahalakshmi Devi palkhi: उदे गं आई उदेचा अखंड गजर

निपाणीत महालक्ष्मी देवीच्या पालखीची मिरवणूक उत्साहात : भाविकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : महालक्ष्मी देवीच्या नावानं चांगभलं, उदे गं आई उदे उदे व नारायणी, नारायणीच्या गजरात निपाणी निवासिनी श्री महालक्ष्मी देवीची भव्य पालखी मिरवणूक रविवारी शहराच्या प्रमुख मार्गावरून वाजत-गाजत काढण्यात आली. पालखी मिरवणुकीचा प्रारंभ आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते तसेच दादाराजे निपाणीकर व साम्राज्यलक्ष्मीराजे निपाणीकर यांच्या हस्ते देवीची आरती करून करण्यात आला. पालखी मिरवणुकीचा प्रारंभ कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. सकाळी डॉ. शीतल चौगुले व शरयू चौगुले दाम्पत्याच्या हस्ते देवीला अभिषेक करण्यात आला.

पालखी मिरवणुकीच्या अग्रभागी घोडे, बेडकीहाळ व कराड येथील बँड, करडी ढोल, हलगी, विविध मुखवटे हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. सायंकाळी 7 नंतर बेळगाव नाक्यापासून विविध लाईट इफेक्ट्स व साऊंड सिस्टिम लावण्यात आले. रविवार पेठ, निराळी गल्ली, प्रभात टॉकीज, जिजामाता चौक, दर्गा गल्ली कॉर्नर, कामगार चौक, शिवाजी चौक, जोशी गल्ली, बेळगाव नाका, जुना पी. बी. रोड, साखरवाडी, अशोकनगर, कोठीवाले कॉर्नर, महादेव गल्ली, कुंभार गल्ली, मुगळे गल्लीमार्गे पहाटे ही पालखी मिरवणूक परत महालक्ष्मी मंदिराजवळ नेण्यात आली. महालक्ष्मी पालखीचे स्वागत करण्यासाठी विविध गल्ल्यांमधून महिलांनी रांगोळ्या घातल्या होत्या. ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

मंगळवार पेठ येथील भगवा ग्रुपतर्फे आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. होत्या. साखरवाडी येथेही नागरिकांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे भव्य स्वागत केले. कोठीवाले कॉर्नर येथे सजावट करून देवीची प्रतिकृती उभारण्यात आली होती. अशोकनगर भागात विद्युत रोषणाई करून देवीच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पालखीचे भोवी होण्यासाठी तरुणाईने पालखीजवळ गर्दी केली होती. तसेच देवीचा मुकुट असलेला कलश डोईवर घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. वाजत-गाजत, देवीच्या घोषणांचा गजर करत भंडाराच्या उधळणीत ही पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली.

यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष आशिषभाई शाह, प्रशांत गुंडे, रोहन साळवे, राजेश कदम, जयवंत भाटले, राजू गुंदेशा, सुनील पाटील, अभिनंदन मुदकुडे, अरुण काशिदकर, रवींद्र शेट्टी, समित सासणे, दीपक वळीवडे, रामा काजवे, उत्तम सांगावकर, प्रशांत सावंत, संजय जबडे, रवींद्र इंगवले, धनाजी क्षीरसागर, रवी घोडके, डॉ. माधव कुलकर्णी, आकाश शेट्टी, महादेव आंबेकर, राजू घाटगे, अरुणा मुदकुडे, अनिल फुटाणकर, मोहिते, ज्योती गुुंडे, तृप्ती शाह यांच्यासह शहर व परिसरातील कार्यकर्ते व भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

अष्टलक्ष्मी रूपात पालखीची सजावट

निपाणी निवासिनी महालक्ष्मी देवीच्या पालखीची सजावट महादेव आंबेकर व राजू घाडगे यांनी अष्टलक्ष्मी रूपात केली होती. ही पालखी वाहून नेण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. दुपारी 1.15 वाजता सुरू झालेली ही मिरवणूक सायं. 6 वा. शिवाजी चौकामध्ये आली होती. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. बेळगाव नाका येथे फटाक्यांची आतिषबाजी करून पालखीचे स्वागत करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT