विजापूर : जिल्ह्यातील कोल्हारजवळील राष्ट्रीय महामार्ग 52 वर अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षामधील दोन महिलांचा मृत्यू झाला. सदर घटना शनिवारी रात्री कोल्हार येथील यूकेपी क्रॉसजवळ कोरेम्मादेवी मंदिराजवळ घडली. अन्नपूर्णा नेवणी (वय 39) पारव महांतप्पा अन्नेप्पनवर (वय 65) अशी त्यांची नावे आहेत.
यूकेपी क्रॉसहून राष्ट्रीय महामार्ग 52 मार्गे बिळगीकडे जात असलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. या अपघातात अन्नपूर्णा नेवणी यांचा जागीच मृत्यू झाला तर पारव अन्नेप्पनवर यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही महिला बागलकोट जिल्ह्यातील बिळगी तालुक्यातील मुत्तलदिन्नी आर. सी. गावच्या रहिवासी आहेत.
रिक्षामधील इतर काहीजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण शेतात मजुरीचे काम आटोपून गावाकडे परतत असताना हा अपघात झाला. घटनास्थळी कोल्हार पोलिस ठाण्याचे पीएसआय अशोक नायक व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.