खानापूर : खाद्याच्या शोधात भटकणाऱ्या दोन हत्तींचा वीजभारित तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना सुलेगाळीत (ता. खानापूर) रविवारी (दि. 2) सकाळी घडली. दोन्हीही हत्ती नर असून, एकाचे वय 20 ते 22 तर दुसऱ्याचे वय 40 ते 45 आहे. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून दहा ते बारा हत्तींचा कळप नागरगाळी परिसरातील शिवारात संचार करत आहे. काही दिवसांपूर्वी शेजारच्या दांडेली जंगलातून अन्नाच्या शोधात ते तालुक्यात आले आहेत. या कळपापैकी दोन हत्तींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नागरगाळीचे सहायक वनसंरक्षक शिवानंद मगदूम, वनक्षेत्रपाल सचिन होनमनी आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पशुवैद्याधिकारी तसेच पशुतज्ज्ञांच्या उपस्थितीत दोन्ही हत्तींची जागेवरच उत्तरीय तपासणी करण्यात आली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी सुलेगाळीतील शेतकरी गणपती गुरव यांनी आपल्या शेताभोवती सौरकुंपण उभारले आहे. शेतकरी केवळ रात्रीच्या वेळेस सौर कुंपणात वीज प्रवाह सुरू ठेवतात. दिवसा हा प्रवाह बंद ठेवला जातो. जवळून हेस्कॉमची वीजवाहिनी गेली आहे. त्यापैकी एकतार या सौरकुंपणावर पडली होती. त्यामुळे, या तारेतून उच्च दाबाचा वीज प्रवाह गेला होता. त्यामुळे, सौरकुंपणातही वीज प्रवाह निर्माण होऊन ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परिणामी या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे. याचा वनखाते तपास करत आहे.