निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावर भरधाव ट्रक चालकाचा ताबा सुटून कार व दोन ट्रकना धडक दिल्याने दोन ट्रक पलटी झाले. या अपघातात चारही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
ट्रक चालक प्रवीणकुमार (पूर्ण नाव समजू शकले नाही) हा बंगळूरहून पुण्याकडे जात होता. घाट उतारावर हा ट्रक आला असता चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे पुढे निघालेल्या अन्य दोन वाहनांना धडक देत कारलाही धडक दिली. यात दोन ट्रक पलटी झाले. या वाहनातील चालक व क्लिनर यांनी प्रसंगावधान राखत आपला बचाव केला. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र या अपघातात चारही वाहनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षका उमादेवी यांच्यासह रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे व संतराम माळगे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करून दिली.