Traffic jam due to undisciplined highway work in Khanapur
खानापूर : पुढारी वृत्तसेवा
शहरातून गेलेल्या महामार्गाचे बेशिस्त पद्धतीने सुरू असलेले काम प्रवाशांना तापदायक ठरले आहे. रस्ताकामाचा वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी कोणतीच खबरदारी घेतलेली नसल्याने फिश मार्केटजवळ धोकादायक खड्ड्यातून वाहन नेण्याचा प्रयत्न करताना थार कलंडून दोन तास वाहतूक ठप्प झाली.
फिश मार्केटनजीक भूसंपादन न करता तसेच शेतकऱ्यांना जमिनीची भरपाई न देता सुरू असलेल्या रस्ता कामाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे येथील पुलाचे काम सध्या ठप्प आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दुचाकी जाण्याकरिता खड्ड्यातून चार फुटाची अरुंद वाट करून देण्यात आली आहे. या धोकादायक जागेवरून एकाने थार कार नेण्याचा प्रयत्न केला. पण हे धाडस त्याच्या अंगलट आले.
थार पलटी झाल्यानंतर ती बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने प्रयत्न करण्यात आला; मात्र तो अयशस्वी ठरला. अखेर जेसीबीच्या मदतीने थार बाहेर काढण्यात आली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
मात्र अरुंद रस्त्यावर थार कलंडून आडवी झाल्याने पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. आठ दिवसांपूर्वी याच ठिकाणी ट्रॅक्टर पलटी होण्याची घटना घडली होती. आज थार पलटी झाल्याने हा रस्ता वाहनचालकांसाठी किती धोकादायक आहे, हे स्पष्ट झाले आहे. आमदार विठ्ठल हलगेकर व खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी यासंदर्भात जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांची बैठक बोलावून तोडगा काढावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
जीव मुठीत घेऊन प्रवास
कंत्राटदाराने कामाचा दर्जा व प्रवाशांच्या सोयीचा विचार न करता केवळ आपले काम पूर्ण करण्याकडे लक्ष दिले आहे. जांबोटी क्रॉस ते शिवस्मारक चौकापर्यंत सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्ता काम शिल्लक असलेल्या बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातूनच दुहेरी वाहतूक सुरू आहे. अतिशय अरुंद जागेत वाहनांचे पार्किंगही करावे लागत आहे. परिणामी पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.