बेळगाव

बेळगाव : अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व्यवहार बंद

दिनेश चोरगे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  सरकारने यापूर्वी कडधान्यावर कर आकारला नव्हता. त्यामुळे कडधान्य व किराणा साहित्याचे दर भडकले नव्हते. केंद्र सरकारने आता पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा निषेध म्हणून एपीएमसी व रविवार पेठमधील व्यापार्‍यांनी शनिवारी आपले व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला.

बेळगाव जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यांतूनही मोठ्या संख्येने लहान व्यापारी, ग्राहक खरेदीसाठी येथे येत असतात. केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. लागू करण्यात आलेला जीएसटी अन्यायकारक आहे. त्यामुळे आम्हालाही स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. याचा सार्‍यांनाच त्रास होणार आहे. तेव्हा पूर्वीप्रमाणेच कडधान्ये जीएसटीमुक्त करावीत, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली
आहे.

पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. यामुळे आधीच महागाईत होरपळणार्‍या गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाचा खर्च वाढणार आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही शनिवारी व्यवहार बंद ठेवले.
– जयदीप सिद्धण्णवर, व्यापारी, रविवार पेठ

यापूर्वी कडधान्यावर शून्य कर आकारला जात होता. जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के कर आकारल्याचे धोरण अवलंबल्याने पुन्हा महागाई वाढणार आहे. त्याचा निषेध म्हणून बंद पाळला.
– अमर गाडवी (हिडदुग्गी) किराणा व्यापारी

एपीएमसीमधून बेळगावातील व्यापार्‍यांना कडधान्यांचा पुरवठा केला जातो. कडधान्य, तांदूळ, रवा, आटा यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीवर पाच टक्के जीएसटी आकारणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हा कर केंद्र सरकारने मागे घ्यावा.
– बसवंत मायाण्णाचे, एपीएमसी व्यापारी

केंद्र सरकारने पाच टक्के वाढ केलेली जीएसटी करप्रणाली रद्द व्हावी. त्याचा निषेध म्हणून शनिवारी व्यापार्‍यांनी व्यवहार बंद ठेवून बंद पाळला. आमच्या मागणीचा विचार होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.
– संतोष अतिशेट्टी, व्यापारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT