निपाणी : निपाणी भागाचे नगदी पीक असलेल्या तंबाखू पिकाची खरेदी विक्री 70 टक्के पूर्ण झाली आहे. परंतु तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला नसल्याने निपाणी भागातील शेतकरी नाराज आहेत. यावर्षी निपाणी, कापशी व संकेश्वर भागात 125 ते 205 रुपये प्रति किलो दराने तंबाखूची खरेदी झाली आहे.
कापशी खोऱ्यात 125 ते 145, संकेश्वर भागात 130 ते 142, अकोळ भागात 140 ते 205, डोंगरी भागात 125 ते 145 दराने व्यापाऱ्यांनी तंबाखू खरेदी केला आहे. अध्याप 30 टक्के तंबाखू खरेदी करणे बाकी आहे. यामध्ये चांगल्या दर्जाचा तंबाखू असल्याने या शेतकऱ्यांच्या अपेक्षा ज्यादा दर मिळावा अशा आहेत.
निपाणी भागात पूर्वीपेक्षा तंबाखूचे क्षेत्र कमी झाले आहे. मागणी पुरवठ्याप्रमाणे तंबाखूला जादा दर मिळायला हवा होता. परंतु बाजारपेठेत गुजरातचा तंबाखू मिसळून भेसळ करून दर पाडण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षापासून सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यातून होत आहे. निपाणीचे तंबाखूची बाजारपेठ चांगल्या उत्पादकांच्या हाती राहिलेली नसल्याची खंत बाळकृष्ण चेंडके यांनी ‘पुढारी’शी बोलून दाखवली. ते म्हणाले, चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी उत्साही राहिलेला नाही कमी दराने तंबाखू शेती करणे परवडत नाही. शेतमजुरांच्या एक दिवसाच्या मजुरी एवढा तंबाखूला दर मिळायला हवा.
2012 साली 130 रुपये दर मिळाला होता महागाईच्या मानाने यावर्षी तंबाखू दरात वाढ मिळायला हवी होती; परंतु गतवर्षीच्या तुलनेत फक्त चार ते पाच रुपये वाढ दिली गेली आहे. अकोळ येथील कावळे भारमल फर्मने 180 ते 195 रुपये दराने तंबाखूची खरेदी केली आहे. या फार्मला चांगला दर देणे परवडते मग इतरांना का नाही असा सवाल त्यांनी केला. जत्राट येथे यावर्षी तंबाखू चांगला होता तो पावसात सापडला नव्हता तरीदेखील 150 ते 160 या सरासरी दराने खरेदी झाली आहे. कावळे भारमल फर्मने येथील दोन कलमे 182 ते 178 दराने खरेदी केली. दर कमी मिळत असल्याने चांगला उत्पादक भरडला जात आहे.
काही गावातील तंबाखू पावसामध्ये सापडला होता. बाजारपेठेत दराचे सातत्य नाही बे भरवशाची अशी तंबाखूची बाजारपेठ झाली आहे. त्यामुळे चौथाई ने शेती करणाऱ्याला ती परवडत नाही. सरकारी निर्बंधामुळे तंबाखूचे क्षेत्र दरवर्षी कमी होऊ लागले आहे. पाण्याची सोय असणारा शेतकरी ऊस व इतर पिकाकडे वळला आहे. पूर्वी निपाणीतील तंबाखू कमिशन एजंट पेढिला शेतकरी जगला पाहिजे ही भावना होती परंतु शासनाच्या निर्बंधामुळे दलालांचे लक्ष विचलित झाले आहे. तंबाखू खरेदी विक्रीमध्ये टेस्टर ची भूमिका महत्त्वाची असते; परंतु बिडी ओढणारे कमी झाले आहेत.
चांगला दर्जाचा तंबाखू टेस्टर बिडी ओढूनच ठरवतो. यावर्षी सर्वसामान्य शेतकऱ्याला दोनशे रुपये तर चांगल्या दर्जाच्या 250 कृपयापर्यंत दर मिळायला हवा होता. दहा वर्षांपूर्वी 900 रुपये ला शेती नांगरणी होत होती ती आता 2000 झाली आहे डीएपी लागवड 450 रुपये दहा वर्षांपूर्वी होते आता 1500 रुपये मोजावे लागतात. पन्नास रुपयावरून 10 वर्षात शेतमजुरी 250 ते 300 रुपयांवर गेली आहे. 1990 ते 2010 पर्यंत तंबाखूला दरवाढ मिळत होती त्यानंतर अपेक्षित अशी दरवाढ मिळेनाशी झाली आहे.
अकोळचे रावसाहेब राऊत म्हणाले, यावर्षी अकोळ भागात 140 ते 170 पर्यंत सरासरी खरेदी झाली आहे. सर्वाधिक दर 190 रुपये झाला आहे येथील 70% खरेदी पूर्ण झाली आहे परंतु अपेक्षित दर मिळाला नसल्याने येथील शेतकरी नाराज आहे. चांगला दर मिळावा अशी उर्वरित शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पाण्याची सोय असलेला शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे. खर्चाच्या मानाने तंबाखू पिकाला चांगला दर मिळायला हवा. ममदापूर येथेही 188 पर्यंत दर गेला आहे. शेतकरी आता हिशोबी झाला आहे त्यामुळे खर्च किती व उत्पन्न किती मिळते याचा ताळमेळ घालने त्याला कठीण झाले आहे.
शेंदूर, शिपूर, गोंदीकुप्पी, पांगिर बी, यरनाळ, गव्हाण, तवंदी व अंमलझरी या डोंगरी भागात 120 ते 145 रुपये दराने तंबाखूची खरेदी झाली आहे पूर्वी कमिशन बेसवर धंदा केला जात होता परंतु आता व्यापारी आपली माणसे सोडून तंबाखू कमी दराने खरेदी करून आपल्या माणसाला कमिशन न देता थोडा जादा दर देऊन तंबाखू घेत आहे. येथील तंबाखूला 165 ते 170 रुपये पर्यंत दर मिळायला हवा होता अशी माहिती संभाजी गायकवाड यांनी दिले. ते म्हणाले गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने तंबाखूची उत्पादन घटले होते. तंबाखू क्षेत्र वर्षाला घटत असून मजुरांचा तुटवडा औषध व खतांचा वाढता दर परवडत नाही. सिगारेट उत्पादक कंपन्या बाड करजगाव व बालवाडी भागात सिगारेट साठी लागणाऱ्या तंबाखूचे तरु शेतकऱ्यांना देऊन तो तंबाखू खरेदी केला जात आहे. त्यामुळे पारंपरिक तंबाखूला बगल देण्यात आला पर्याय निर्माण केला जात आहे.
निपाणी भागातून देसाई बिडी, टेलिफोन बिडी, 10 नंबर बिडी, सयदु बिडी, परिमल शेठ कलकत्ता येथील अमीर भाई व दक्षिणेतील व्यापारी तंबाखू खरेदीसाठी यावर्षी आले होते. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांना चांगला दर दिला गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 ते 6 रुपये अधिक दर दिला गेला असल्याची माहिती अक्षय जोशी यांनी दिली.