निपाणी : निपाणी परिसरातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तंबाखू पिकाची यंदा समाधानकारक वाढ झाली असली, तरी पाऊस आणि पाण्याच्या कमतरतेचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतात तंबाखूची झाडे जोमदार दिसत असली, तरी अपेक्षित पाणी उपलब्ध न झाल्याने पानांची वाढ आणि वजन यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा तंबाखूच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.
निपाणी तालुक्यातील सौंदलगा, हदनाळ, जत्राट, बेनाडी, भोज, शिरगुप्पी, मांजरी, कुन्नूर, गळतगा, अकोळ, ममदापुर, खडकलाट यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये तंबाखूची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकावर अनेक शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच पाण्याचे नियोजन करावे लागले.
काही भागांत सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिल्याने पिकाची उगवण आणि वाढ समाधानकारक झाली. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. विहिरी, कूपनलिका आणि अन्य जलस्रोतांवर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपलब्ध पाण्याच्या मर्यादेमुळे प्रत्येक शेताला पुरेसे पाणी देणे शक्य झाले नाही. परिणामी तंबाखूच्या पानांची अपेक्षित जाडी, लांबी आणि वजन मिळण्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
सध्या तंबाखू उत्पादक शेतकरी खुडा, पानाची काढणी आणि पुढील प्रक्रियेच्या नियोजनात व्यस्त आहेत. मात्र उत्पादनातील संभाव्य घट आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. मजुरी, खते, औषधे आणि मशागतीचा वाढता खर्च लक्षात घेता यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरणार आहे. एकंदरीत, शेतात पीक जोमात दिसत असले तरी पाण्याच्या कमतरतेची झळ उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा तंबाखूचा हंगाम गुणवत्तेच्या दृष्टीने समाधानकारक, मात्र उत्पादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा ठरण्याची चिन्हे आहेत.