बेळगाव : जगातील सर्वात मोठा व सर्वाधिक विषारी असलेला किंग कोब्राचे आता तिलारीच्या जंगलातही आढळ असल्याचे सिद्ध झाले आहे. तिलारी जंगलांच्या कुशीत वसलेल्या कळसगादे गावानजीक एक १३ फुटी किंग कोब्रा नुकताच आढळून आला. वनखात्याच्या बचाव पथकाने त्याला पकडून सुरक्षितपणे अधिवासात सोडून दिले. मात्र, हा साप आढळल्याने तिलारीच्या जंगलाची समृद्धता अधोरेखित झाली आहे.
तिलारीच्या जंगलात किंग कोब्राचे अस्तित्व असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. मी स्वतः दोन वर्षांपूर्वी तिलारी धरण परिसरात हा साप पकडला होता. पाणथळ जागेत हा साप अधिकत्वाने आढळतो. त्याचे संरक्षण व संवर्धन करण्याची गरज आहे.- आनंद चिट्टी, सर्पमित्र
बेळगावात खानापूरच्या जंगलातही त्याचे वास्तव्य असले तरी त्याचे दर्शन दुर्मीळच असते. याउलट कारवार, शिमोगा, उडुपी, मंगळूर आदी जिल्ह्यांमध्ये त्याचा आढळ सामान्य आहे. पण, विलारी व आसपासच्या परिसरात किंग कोब्रा दिसल्याचे कधी ऐकिवात नव्हते. या भागात त्याचे अस्तित्व असले तरी ते सहसा कधीच दिसत नाहीत. परंतु, डिसेंबर २०२२ मध्ये तिलारी धरणाच्या भिंतीजवळ एक किंग कोब्रा आढळला होता, बेळगावचे सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी त्याला पकडून सुरक्षितस्थळी सोडून दिले होते. त्यावेळी पहिल्यांदाच या भागात किंग कोब्राचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले होते. पण, त्यानंतर हा साप कुठेच आढळला नव्हता.
दोन दिवसांपूर्वी पाटणे वन परिक्षेत्रातील कळसगादे गावच्या शिवारात एक महाकाय साप दिसल्याची माहिती स्थानिकांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी बचाव पथकासमवेत संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तो किंग कोब्रा असल्याचे स्पष्ट झाले. बचाव पथकातील सदस्यांनी महत्प्रयासाने त्याला पकडले. त्याची लांबी मोजली असता ती १३ फूट भरली. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात घालून सुरक्षितस्थळी नेऊन सोडण्यात आले.
सापाला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापूरचे उपवनसंरक्षक गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे, प्रदीप सुतार, वनपाल डिसूझा, नागवेकर, वनरक्षक अलका लोखंडे, अतुल खोराटे, वनसेवक मोहन तुपारे, विश्वनाथ नार्वेकर यांनी ही कामगिरी पार पाडली.