बेळगाव ः परदेशात नोकरीच्या आमिषाने गेलेल्या तीन तरुणांची बेळगावच्या सायबर क्राईम विभागाने सहीसलामत सुटका केली आहे. बेळगावसह अन्य ठिकाणच्या टोळक्याने 20 जणांसोबत असा प्रकार केल्याचे समोर येत आहे.
विशेष म्हणजे नोकरी लावतो म्हणून येथे रक्कम उकळलीच. परंतु, परदेशात ज्यांच्याकडे नोकरीला ठेवले ते ठिकाण ऑनलाईन फसवणूक करणार्यांचे टोळके होते. त्यांच्याकडे या तरुणांना सोपवून तेथूनही प्रत्येकी तीन लाखाची रक्कम उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून येथील तरुणांना परदेशात नेऊन चक्क त्यांची तीन लाखांना विक्री केल्याचाच हा प्रकार असल्याचे समोर येत आहे.
परदेशात नोकरीला गेलेल्या आपल्या मुलांशी संपर्क होत नसल्याने 25 डिसेंबर रोजी सचिन विठ्ठल कागीनकर यांनी शहर सीईएन पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यांनी फिर्यादीत म्हटले होते की, आकाश विठ्ठल कागीनगर व अन्य दोघे जुळे भाऊ ओंकार संभाजी लोखंडे व संस्कार संभाजी लोखंडे या तिघांना बँकॉक येथे नोकरी लावतो असे सांगत संशयित प्रसन्ना हुंदरे (रा. महात्मा फुले रोड, शहापूर) याने त्यांना फशी पाडले. तेथे दरमहा सव्वा लाख पगार मिळत असल्याचे सांगत तिघांकडून अडीच लाखाची रक्कम उकळली.
या प्रकरणात असिफ व अमित (रा. पंजाब) हे दोघे एजंट आहेत. त्यांनी तिघा तरूणांना दिल्लीहून बँकॉकला न नेता तेथून त्यांना कंबोडिया येथे नेले. तेथे ऑनलाईन फसवणूक करणार्या टोळीच्या त्यांना हवाली केले. या तिघा तरुणांनी हे असले काम आम्ही करत नाही, असे म्हटल्यानंतर त्यांना तेथील म्होरक्याने तुमच्या एजंटांना आम्ही तुमचे प्रत्येकी तीन लाख रूपये दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला हेच काम करावे लागेल, असे सांगत त्यांचे मोबाईल काढून घेतले. यानंतर त्यांचे हाल सुरू केले. त्यांना वेळेवर जेवण नाही शिवाय पाणीही देत नसल्याचे या तरुणांनी सांगितले. आपल्या मुलांशी संपर्क होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर क्राईम ठाणे गाठून याबाबतची फिर्याद दिली.
पोलिस आयुक्तांसह टीमचे कौतुक
हे प्रकरण पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी गांभीर्याने घेतले. तत्कालीन सीईएनचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांना सूचना दिली. शिवाय आयुक्तांनी बंगळूर येथील एमिग्रेशन कार्यालय, सीआयडी अधिकार्यांशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. कालीमिर्ची यांनीही तातडीने सूत्रे फिरवत या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास सुरू केला. त्यामुळे या तीन तरुणांची परदेशातून सुटका झाली. 9 जानेवारी रोजी ते सुखरूप बेळगावला पोहोचल्याचे पोलिसांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.