निपाणी : मधुकर पाटील गेल्या तीन-चार वर्षांपासून कांदा पिकाला मिळणाऱ्या हक्काच्या दरापासून शेतकरीवर्गाला मुकावे लागले होते. यंदा बाजारपेठेत चांगला दर असल्याने अनेक शेतकरी कांदा उत्पादन घेण्याकडे वळत आहेत. चांगला दर मिळाल्याने रब्बी हंगामात गारवा कांदा पिकाच्या क्षेत्रात भरमसाट वाढ होणार आहे.
पंधरा दिवसांत कांदा लागवडीला प्रारंभ होणार आहे. खरिपात प्रारंभी सोयाबीन व इतर पर्यायी पिक घेऊन कांदा पीक घेण्याच्या दृष्टीने तयारी चालविली आहे. उसात आंतरपीक म्हणून या पिकाचे उत्पादन घेतले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निपाणी परिसरात त्यातल्या त्यात सौंदलगा येथे गारवा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अकोळ परिसर जसा तंबाखूसाठी प्रसिद्ध, त्याप्रमाणेच सौंदलगा परिसर गारवा कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. दराअभावी गेल्या दोन वर्षांपासून या पिकाखालील क्षेत्रात मोठी घट झाली होती. सौदलगा गावातील शेतकऱ्यांनीही या पिकाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे गेल्या आठ वर्षात दरवर्षी केवळ सौदलगा येथून बंगळूर बाजारपेठेत ३०० ट्रक विक्रीसाठी जाणाऱ्या कांद्याचे उत्पादन अवघ्या १०० ट्रकवर येऊन ठेपले होते.
गतवर्षी बंगळूरसह इतर बाजारपेठेत चांगला दर मिळाल्याने शेतकरीवर्गाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या, सध्या बाजारपेठेत कांद्याचा भाव ५० ते ६० रु. किलो आहे. हाच दर पुढे काही दिवस टिकून राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कांदा रोप लावणीयोग्य तयार झाले आहे. त्यामुळे काही दिवसात म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कांदा लावणीला सुरुवात होणार आहे. मागील दोन-तीन वर्षात कांद्याला कमी दर मिळाला असला तरी बियाणातून तरी लाभ होईल, या आशेने शेतकरीवर्गाने बियाणाची लागवड केली होती. त्याला चांगले हवामान लाभल्याने त्याचे उत्पादनही अपेक्षेपेक्षा यंदा चांगले मिळाले आहे.
कांदा व बियाणाचे उत्पादन घेणे मोठे खर्चिक मानले जाते. बियाणाचे उत्पादन घेताना एका कांद्याचे दोन भाग करून ते जमिनीच्या बोदावर पुरले जातात. कालांतराने त्यास कोंब येऊन बोंडे फुटली जातात. त्यानंतर त्याची जपणूक काळजीपूर्वक करावी लागते. त्याचे कोंब महत्वाचे असल्याने प्राणी व पक्ष्यांपासूनही या पिकाचे संरक्षण करावे लागते. एवढे करुनही अपेक्षेइतका दर मिळत नाही, त्यामुळे या पिकाला जुगारी पीक म्हटले जाते. चालू हंगामात या पिकाची लागवड करण्याची तयारी शेतकरीवर्गाकडून सुरू आहे. कांदा लावण्यासाठी पूर्व मशागत सुरू असल्याची माहिती सौंदलगा येथील कांदा उत्पादक बाळासाहेब पाटील यांनी दिली. यावर्षी क्षेत्र वाढल्यास पुढे दर चांगला मिळेल, याची खात्री नसली तरी बियाणाला मात्र तो मिळणार आहे.
" उसातील आंतरपीक असरणाऱ्या कांदा पिकाचा शेतकरीवर्गासाठी दुहेरी फायदा आहे. या पिकाचा गाला जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करतो. पीक न साधले, तरी पर्याग महणून ऊस पिकाचा आधार बळीराजाला असतो. त्यामुळे निपाणी परिसरात कांद्याचे आंतरपीक घेण्याची पद्धत रुढ झाली आहे." ( शंकर पाटील, कांदा उत्पादक, सौंदलगा )