बेळगाव : चेन्नईवरून बेळगावला येणार्या विमानात बॉम्ब ठेवला असल्याचे दोन ई-मेल सांबरा विमानतळ प्राधिकरणाला आल्याने एकच खळबळ उडाली. विमानतळ प्राधिकरणाने तातडीने ही माहिती पोलिसांना दिल्याने बॉम्बशोधक आणि श्वानपथकाच्या मदतीने विमानतळ परिसरात तपासणी करण्यात आली. याप्रकरणी मेल पाठवणार्या अज्ञाताविरोधात मारिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, खबरदारीच्या द़ृष्टिकोनातून विमानतळ परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
चेन्नईवरून सांबरा विमानतळावर येणार्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा पहिला मेल शुक्रवारी (दि. 18) आला. त्यानंतर पुन्हा दुसरा मेल शनिवारी (दि. 19) सायंकाळी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटवर प्राप्त झाला. सदर मेल विमानतळाचे संचालक एस. त्यागराजन यांनी पाहिला. बेळगाव-चेन्नई विमानसेवा नसतानादेखील मेल पाठवणार्या अज्ञातांनी चेन्नईहून निघणार्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा मेल पाठवला. पण, याकडे दुर्लक्ष न करता खबरदारी म्हणून संचालकांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली.
मारिहाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना देत आपल्या सहकार्यांसह तातडीने विमानतळाकडे धाव घेतली. लागलीच पोलिस बंदोबस्तदेखील वाढविण्यात आला. श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने विमानतळाच्या बाहेरील आणि आतील परिसरात तपासणी करण्यात आली. मात्र, कोठेही स्फोटक वस्तू आढळून आल्या नाहीत. मात्र, काही वेळ विमानतळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विमानतळ आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. अज्ञाताविरोधात मारिहाळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालविला आहे.
चेन्नईवरून सांंबरा विमानतळाकडे येणार्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा मेल सांबरा विमानाला पाठवला आहे. त्यामुळे खबरदारीच्या दृष्टीने सांबरा विमानतळ परिसरात श्वानपथक तसेच बॉम्बशोधक पथकाच्यावतीने तपासणी करण्यात आली. मात्र, कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू आढळलेली नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.याडा मार्टिन मार्बन्यांग, पोलिस आयुक्त