सौंदत्ती यल्लम्मा देवीचे द्वार उघडले, मंदिर सुरू  
बेळगाव

सौंदत्ती यल्लम्मा देवीचे द्वार उघडले, मंदिर सुरू

सौंदत्ती यल्लम्मा देवीचे द्वार उघडले, मंदिर सुरू

दीपक दि. भांदिगरे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेले आदिशक्ती सौंदत्ती यल्लम्मा देवीचे द्वार आज मंगळवारपासून भक्तांसाठी खुले झाले आहे. सकाळी 6.30 वाजता विशेष पूजा झाल्यानंतर भक्तांना देवीचे मुखदर्शन घेण्यासाठी मंदिर खुले करण्यात आले. कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजीही भक्तांनी घ्यायची असून, मंदिर प्रशासनानेही याची खबरदारी घेतली आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून कर्नाटक-महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील भक्तांना सौंदत्ती यल्लम्मा दर्शन बंद झाले होते; परंतु हे मंदिर खुले केल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भक्तगण येणार म्हणून मंदिर व्यवस्थापनाने देखील ठिकठिकाणी फुलांचे तोरण, केळीचे खूट बांधून मंदिर परिसर सजवला आहे. शिवाय गाभार्‍यातील मूर्ती व पूर्ण गाभारा देखील रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक बनवला आहे.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून घरातूनच देवीचे दर्शन घेणार्‍या लाखो भक्तांना आता प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे. मंगळवारपासून देवीचे दर्शन मिळणार हे माहिती झालेले असंख्य भक्त रविवारी व सोमवारीच डोंगरावर दाखल झाले आहेत.

भक्तांना रांगेत सोडण्यासाठी सामान्य व विशेष अशा दोन रांगांची व्यवस्था केली आहे. या दोन्ही रांगा महाद्वारजवळ जाऊन मिळतात. देवीचे दर्शन घेऊन भक्तांनी इकडे तिकडे न फिरता रांगेतूनच बाहेर जायचे आहे. भक्तांनी कोरोना नियमांचे पालन करावे इतकीच अपेक्षा आहे.

– रवी कोटारगस्ती, कार्यकारी अधिकारी, यल्लम्मा मंदिर

चोख प्रशासकीय व्यवस्था

कोरोना अद्याप संपलेला नसल्याचे सांगत डोंगरावर प्रशासकीय यंत्रणेने सर्व चोख व्यवस्था केली आहे. मास्क, सुरक्षित अंतर ठेवून भक्तांनी रांगेत थांबणे, सॅनिटायझरचा वापर करण्याची सूचना केली आहे. भक्तांनी सुरक्षित अंतरावर थांबावे, यासाठी मार्किंग केलेले आहे. येथे थर्मल स्क्रिनिंग पूर्ण झाल्यानंतरच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

चोख पोलिस बंदोबस्त

बर्‍याच कालावधीनंतर मंदिर सुरू असल्याने भक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला आहे. यल्लम्मा मंदिराच्या आधी येणारे उगरगोळ, जोगणभावी व सौंदत्ती डोंगराच्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेडस् लावलेले आहेत. डोंगरावर जाताना गर्दी व वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.

व्यापार्‍यांच्या आशा पल्लवीत

दीड वर्षापासून व्यापार नसल्याने डोंगरावरील व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रसाद, भंडारा, फळविक्रेते, खेळणी विक्रेत्यांसह सर्वच व्यापार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांनीही आपली दुकाने सजवली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT