खानापूर : बेळगाव-गोवा (व्हाया चोर्ला) राज्य महामार्गावरील कालमणीजवळील चढतीवर एकाच ठिकाणी दोन ट्रक अडकून पडल्याने सोमवारी (दि. 1) तब्बल दहा तास चक्काजाम झाला. यामुळे या मार्गावरील रहदारी दिवसभर ठप्प झाली होती.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेकडो वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालकांसह प्रवाशांचे अतोनात हाल झाले. जांबोटी व खानापूर पोलिसांनी सहा तास अथक परिश्रम करून दोन क्रेनच्या सहाय्याने सायंकाळी पाचच्या सुमारास दोन्ही वाहने बाजूला केल्यानंतर रहदारी पूर्ववत सुरू झाली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, कालमणीजवळील कावळीच्या नाल्याजवळ रविवारी दुपारी एक ट्रक नादुरुस्त होऊन थांबला होता. बाजूच्या अरुंद जागेतून वाहनांची ये-जा सुरू होती. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे नादुरुस्त झालेल्या ट्रकसमोरील बाजूपट्टी खचून मोठा खड्डा पडला. त्यातूनच धोकादायक वाहतूक सुरू होती. सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास गोव्याहून येणार्या ट्रकचालकाला अरुंद जागेचा अंदाज आला नाही. ट्रक बाजूने घेण्याच्या प्रयत्नात ट्रक रस्त्याकडेला कलंडला. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला.
बघता बघता कालमणी ते कणकुंबीपर्यंत आणि कालमणी ते जांबोटीपर्यंत शेकडो वाहनांची रांग लागली. अनेकजण दिवसभर वाहनातूनच अडकून पडले. खानापूर पोलिसांनी दोन क्रेन मागवून दोन्ही अडथळे बाजूला केल्यानंतर सायंकाळी रहदारी सुरळीत झाली.