Randeep Singh Surjewala- Siddaramaiah meet Pudhari
बेळगाव

Randeep Singh Surjewala- Siddaramaiah meet: मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी हालचाली

रणदीपसिंग सुरजेवाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : राज्यातील काँग्रेसमध्ये सत्ता हस्तांतरावरून सुरू असलेल्या गदारोळातही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कशाचीही पर्वा न करता मंत्रिमंडळ फेरबदलाला सुरुवात केली आहे. बागलकोट आणि दावणगिरी पोटनिवडणुकीची रणनीती आणि उमेदवारांच्या निवडीवर चर्चा करण्यासाठी बंगळूरमध्ये दाखल झालेले राज्य काँग्रेस प्रभारी आणि काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांच्याशी चर्चा केल्यानंतर सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. पक्षाच्या वरिष्ठ आमदारांनी अलीकडेच भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराची विनंती केली होती. तसेच नवीन आमदारांनीही मंत्रिमंडळात सामिल होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा ठराव झाला होता. त्यामुळे आमदार मंत्रिमंडळ फेरबदलाची मागणी करत आहेत. प्रशासकीय यंत्रणेला नवी प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

या विषयावर चर्चा करण्यासाठी ते लवकरच दिल्लीला येणार आहेत, असे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी रणदीपसिंग सुरजेवाला यांना सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर सुरजेवाला यांनी अनेक आमदारांनीही त्यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे. मंत्रिमंडळातील काही अकार्यक्षम लोकांना वगळावे लागेल हे अटळ आहे. हायकमांडलाही हेच हवे आहे. मंत्रिमंडळात फेरबदल किंवा विस्तार करणे हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे. या बाबतीत कोणत्याही गोंधळाला वाव राहता कामा नये. त्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून यावर चर्चा करावी आणि एकमताने निर्णय घेऊन दिल्लीला यावे. तिथे आम्ही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे संघटन सचिव वेणुगोपाल यांच्याशी बोलून निर्णय घेऊ, असे ते म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंत्रिमंडळ फेरबदलासह काही मुद्दे सध्या बाजूला ठेवून प्रथम पोटनिवडणुकांवर लक्ष केंद्रित करावे. यात काँग्रेसच्या उमेदवारांनी दुप्पट मताधिक्याने विजय मिळवून विरोधी पक्षांना उत्तर दिले पाहिजे. ते सध्या त्यावर लक्ष केंद्रित करतील आणि निवडणुका संपल्यानंतर या विषयावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT