कारदगा ः कारदगा ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या स्वाती कांबळे तर उपाध्यक्षपदी सुभाष ठकाणे उर्फ ढोणे यांनी तीन मताने विजयी संपादन केला. निवडणूक अधिकारी म्हणून पाटबंधारे खात्याचे साहाय्यक कार्यकारी अभियंता आप्पासाहेब पुजारी यांनी काम पाहिले. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकानी फटाके व गुलालाच्या आनंदोत्सव साजरा केला.
विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्षांनी कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला होता. निवडणुकीसाठी सत्ताधारी गटाकडून कांबळे व ठकाणे यांनी तर विरोधी गटाकडून सुषमा गवळी व सुकुमार माळी यांनी अर्ज दाखल केला होता.
निवडणुकीत कांबळे व ठकाणे यांना प्रत्येकी 13 तर प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रत्येकी 10 मते मिळाली. निवडणूक अधिकारी पुजारी यांनी तीन मतांनी सत्ताधारी गटाचे उमेदवार विजयी झाल्याचे घोषित केले. पीडीओ नंदकुमार फपे यांनी मावळते व नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष, निवडणूक अधिकारी पुजारी यांचा सत्कार केला. विजयी उमेदवारांची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी तिसर्या आघाडीचे नेते राजू खिचडे, माजी जि. पं. सदस्या सुमित्रा उगळे, माजी ग्रा. पं. अध्यक्ष सुदिपसिंह उगळे, सदस्य विनोद ढेंगे, माजी उपाध्यक्ष किरणकुमार टाकळे, प्रा. अविनाश कांबळे, राहुल रत्नाकर, महादेव डांगे, ज्योती अलंकार, अजित खिचडे, संजय गावडे, पांडुरंग वडर, सम्राट पसारे यांच्यासह सर्व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी जि. पं. सदस्या सुमित्रा उगळे व सत्ताधारी गटाच्या सर्व नेत्यांनी आमच्यावर विश्वास टाकून अध्यक्ष उपाध्यक्षपदी निवड केली ही अभिमानास्पद बाब आहे. सर्वांच्या सहकार्याने गावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे नूतन अध्यक्षा कांबळे व उपाध्यक्ष ठकाणे यांनी सांगितले.