बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुवर्णसौध परिसरातील नव्याने विकसित केलेली बाग आणि कारंज्याचे बुधवारी (दि. 10) रात्री उद्घाटन केले. दीड एकर क्षेत्रात बाग आणि सुशोभीकरणाचे काम करण्यात आले असून या नवीन बागेमुळे सुवर्णसौधच्या भव्य वास्तुकलेला पूरक सौंदर्य प्राप्त झाले आहे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
सुवर्णसौधची ही बाग केआरएस आणि अलमट्टी जलाशयाच्या उद्यानांच्या धर्तीवर विकसित करण्यात आली आहे. सुवर्ण सौधच्या परिसरात कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णा आणि डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या पुतळ्यांभोवती उभारण्यात आलेली बाग आणि सुशोभीकरणाने या परिसराला एक नवीन रुप दिले आहे.
एकूण 4.63 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली बाग आणि सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत 400 लोक बसू शकतील अशी दोन खुली नाट्यगृहे देखील आहेत. बागेत एकूण आठ कारंजे बसविण्यात आले आहेत, दगडी पायर्यांचा धबधबा आणि 30 प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.
यावेळी विधानसभा अध्यक्ष यु. टी. कादर, उपाध्यक्ष रुद्राण्णा लमाणी, पालकमंत्री सतीश जारकिहोळी, मंत्री डॉ. एच. सी. महादेवाप्पा, मुख्य प्रतोद अशोक पट्टण, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित होते.