बेळगाव : हुबळीमधून काही संशयित बांगला देशी नागरिक बेळगावात येत असल्याची माहिती हिंदू संघटनांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर शनिवारी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तीन बस ताब्यात घेऊन सखोल तपासणी केली. मात्र, तपासाअंती हे बांगला देशी नसून पश्चिम बंगाल रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले.
हुबळी येथे बांगला देशी संशयितांची मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांकडून सतर्कता घेण्यात आली. हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हुबळीहून काही संशयित नागरिक बेळगावात दाखल होत असल्याची माहिती पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलिस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली.
पोलिस उपायुक्त नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखाली मार्केटसह विविध पोलिस स्थानकांतील अधिकारी आणि कर्मचारी मध्यवर्ती बसस्थानकात दाखल झाले. पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने बसस्थानक परिसराची पाहणी केली. त्यानंतर संशयाच्या आधारे तीन बस थांबवून त्यातील प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली. प्रवाशांची ओळखपत्रे, प्रवासाची माहिती तसेच त्यांच्या वास्तव्याची पडताळणी करण्यात आली.
बोटावर मतदान केल्याची शाई
पोलिसांनी संशयितांकडे असलेली ओळखपत्रे, आधार कार्ड, प्रवासाशी संबंधित कागदपत्रे तसेच त्यांच्या वास्तव्यासंदर्भातील माहिती तपासली. विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत मतदान केल्याची शाईची खूण काहींच्या हातावर दिसून आली. त्यावरून ते पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झाले.
पोलिसांनी अधिक खातरजमा करत संबंधित व्यक्ती सध्या हुबळी तसेच बेळगाव परिसरात मजुरी आणि इतर कामांसाठी वास्तव्यास असल्याची माहिती मिळवली. काही स्थानिक मालकांकडे ते काम करत असल्याचेही तपासात पुढे आले. संबंधित मालकांची चौकशी करून पोलिसांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. तपासणी मोहिमेत मार्केट विभागाचे एसीपी संतोष सत्यनाईक, पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्यासह अधिकारी सहभागी झाले होते. श्रीराम सेना आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनीही परिसरात उपस्थित राहत काही बसेसची पाहणी केली. श्रीराम सेनेचे रवी कोकितकर यांच्यासह कार्यकर्ते घटनास्थळी होते.