MLA Suraj Revanna arrested
सूरज रेवण्णा यांना लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक File Photo
बेळगाव

Suraj Revanna: आ. सूरज रेवण्णा यांना अटक

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : लैंगिक छळाच्या आरोपाखाली प्रज्वल रेवण्णा कारागृहात आहे. हे प्रकरण देशभर चर्चेत असतानाच त्याचा भाऊ आणि माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांचा मुलगा, विधान परिषद सदस्य सूरज रेवण्णा अडचणीत सापडला आहे. समलैंगिक आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली आमदार सूरज रेवण्णा यांना हासन जिल्हा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अरकलगुडू येथील एका निजदच्या कार्यकर्त्याने सूरज रेवण्णाविरुद्ध तक्रार केली आहे. त्याने सूरज रेवण्णा यांनी आपल्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत होळेनरसीपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात त्याने राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) यांच्याकडेही तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे, होळेनरसीपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम 377, 342 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, फिर्यादीकडून ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचा आरोप करत सूरज रेवण्णा हासन येथील सेन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले असताना, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीनंतर सूरज रेवण्णाला अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने सकलेशपूर डीवायएसपी यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. चौकशीनंतर सूरज रेवण्णाला तपास अधिकारी प्रमोद कुमार यांनी अटक केली.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार निजद पक्षाचा कार्यकर्ता आहे. तो सूरज रेवण्णाच्या ओळखीचा आहे. त्याने आरोप केला आहे की, तो 16 जून रोजी सूरज रेवण्णा यांच्या गनीकडा फार्महाऊसवर नोकरीच्या मागणीसाठी गेला होता. त्यावेळी सूरजने आपल्यावर लैंगिक अत्याचार केले.

सूरज रेवण्णा यांचे नातेवाईक शिवकुमार यांनी शुक्रवारी होळेनरसीपूर पोलिस ठाण्यात फिर्यादीविरुद्ध उलट तक्रार दाखल केली. यामध्ये तक्रारदार 16 जून रोजी सूरज रेवण्णा यांच्याकडे नोकरी मागण्यासाठी आला होता. त्यावेळी सूरज रेवण्णा हे मला काम देऊ शकत नाहीत. मी आर्थिक अडचणीत असून मला 5 कोटीं हवेत, अशी मागणी केली. रक्कम न मिळाल्यास आमदारांविरोधात अनैसर्गिक लैंगिक अत्याचार तक्रार दाखल करू, अशी धमकी दिली होती. असे आरोप केले आहेत. त्यानंतर सूरज रेवण्णा यांनी शनिवारी रात्री हासन पोलिस ठाण्यात स्वत: येत तक्रारदाराविरोधात प्रतितक्रार दाखल केली आहे.

SCROLL FOR NEXT