अंकली/जमखंडी : यंदा उसाला प्रतिटन 3,500 रुपये व मागील थकबाकी मिळावी, यासाठी बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ शहरातील कनकदास चौकात राज्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू होते. आंदोलनाने गुरुवारी हिंसक वळण घेतल्याने शुक्रवारी साखर उद्योगमंत्री शिवानंद पाटील, बागलकोट जिल्हा पालकमंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकरी संघटना, साखर कारखानदार यांच्याशी चर्चा केली. यंदाच्या हंगामाला प्रतिटन 3,300 रुपये व थकबाकी देण्याचा निर्णय झाल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.
मुधोळ शहरात सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला आग लावल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले. वाहनांचेही मोठे नुकसान झाल्याने साखर उद्योगमंत्री शिवानंद पाटील व अधिकार्यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यांनी जळालेल्या ट्रॅक्टरची पाहणी केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री आर. बी. तिम्मापूर, बागलकोट जिल्हा पोलिसप्रमुख, जिल्हाधिकारी, जमखंडीचे प्रांताधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी साखर कारखाना मालक व ऊस उत्पादक शेतकर्यांची पाचवी बैठक घेण्यात आली. या बैठकीत योग्य तोडगा काढण्यात आला असून, गतवर्षीच्या थकीत बिलासह साखर कारखान्यांनी 3,250 रुपये व शासनाकडून 50 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला शेतकरी संघटना व शेतकर्यांनी पाठिंबा दिला असून, आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी अधिकारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.